Join us  

Uddhav Thackeray: मुंबईतल्या गर्दीवर मुख्यमंत्री ठाकरे नाराज, निर्बंध आणखी कडक करण्याचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 3:21 PM

Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील रस्त्यावर होणाऱ्या गर्दीवर नाराजी व्यक्त केली. मुंबईतील गर्दी अशीच कायम राहिली तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला आहे. 

Uddhav Thackeray: मुंबईतील मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ च्या चाचणीचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उदघाटन करण्यात आलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील रस्त्यावर होणाऱ्या गर्दीवर नाराजी व्यक्त केली. मुंबईतील गर्दी अशीच कायम राहिली तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला आहे. 

मुंबईत वांद्रे येथे एमएमआरडीएकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम द्रूतगती महामार्गावर कांदीवलीजवळ मेट्रो चाचणीचं उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री वांद्रे येथील एमएमआरडीएच्या सभागृहाकडे यायला निघाले त्यावेळी रस्त्यावरील दिसलेल्या ट्राफिकवर त्यांनी बोट ठेवलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या भाषणात यावर भाष्य केलं. 

"राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल जनतेशी संवाद साधला. सविस्तर माहिती जनतेला दिली आणि आज सकाळी सारंकाही उघडल्यासारखं लोक गर्दी करताना दिसले. कार्यक्रमाला येताना आम्हालाच ट्राफीक लागलं. हे चालणार नाही. निर्बंधांचं पालन करणं गरजेचं आहे", असं अजित पवार म्हणाले. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अजित पवारांच्या विधानाचा दाखला देत मुंबईतील गर्दीवर नाराजी व्यक्त केली. "अजित दादांना जे वाटलं तेच मलाही जाणवलं. मी काल लॉकडाऊन उठवत असल्याचं तर काही चुकून बोललो नाही ना असं मी अधिकाऱ्यांना विचारलं. इथं येताना रस्त्यावर बरीच गर्दी दिसली हे योग्य नाही. मुंबईत जर अशीच गर्दी कायम राहिली तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील", असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेएमएमआरडीएमुंबईकोरोना वायरस बातम्या