Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 06:30 IST

मुख्यमंत्री ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने आधी राजभवनला कळविले होते.

मुंबई : कोरोनासंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी सायंकाळी राजभवनावर बोलविलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले नाहीत. त्यांच्याऐवजी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर बैठकीला हजर होते.मुख्यमंत्री ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने आधी राजभवनला कळविले होते. बैठकीत राज्यपालांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या आधी मला फोन केला होता आणि ते येऊ शकणार नसल्याचे सांगितले.येत्या जून व जुलैतील कोरोनबाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन संपूर्ण राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची सूचना केली. तसेच बिगर कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, आरोग्य सेवक, रुगणालयांतील उपलब्ध खाटा यांची एकत्रित माहिती देणारा डॅशबोर्ड तयार करा, आघाडीवर राहून कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस यांना प्रोत्साहन देण्याबाबत शासनाने विचार करावा, अशा सूचनाही राज्यपालांनी बैठकीत केल्या. यावेळी मुंबई मनपा आयुक्त आय एस चहल तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीतराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व प्रदीप व्यास, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राज्यपाल हे प्रशासनाला थेट आदेश देतात, राजभवन हे दुसरे सत्ताकेंद्र बनले आहे अशी तक्रार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती.त्यानंतर मुख्यमंत्र्यांची राज्यपाल सदस्य नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर करण्यासंदर्भात राजभवन आणि सरकारमध्ये तणाव निर्माण झाला होता. मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीला न जाण्याकडे त्याही दृष्टीने बघितले जात आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेभगत सिंह कोश्यारी