Join us

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये 'वर्षा'वर रात्री उशिरा तब्बल दोन तास खलबतं, नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 09:01 IST

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये रविवारी रात्री उशिरा बैठक पार पडली.

मुंबई-

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये रविवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. दोघांमध्ये जवळपास दोन तास राज्यातील विविध विषयांवर खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री ११ वाजताच्या सुमारास देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वर पोहोचले. यात दोन्ही नेत्यांमध्ये प्रभादेवीतील राड्याचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता असं सांगण्यात येत आहे. 

मी गोळीबार केला नाही; शिंदेंसोबत गेल्यानं मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरुय- सदा सरवणकर

प्रभादेवीत शिंदे आणि ठाकरे गटातील राड्यानंतर राज्यात परिस्थिती बिघडू नये यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी काय मार्ग काढता येईल यासाठी खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीतील मुद्द्यांवरही चर्चा झाली आहे. याशिवाय राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरुनही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गटामध्ये हाणामारी; दादरमध्ये तणाव, गोळीबार केल्याचा दावा

मुंबईतील प्रभादेवीत शिंदे आणि ठाकरे गटात राडा पाहायला मिळाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये 'वर्षा' बंगल्यावर चर्चा झाली. शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्यावर आर्म अॅक्टनुसार कारवाई करण्यात आल्याची देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. याशिवाय गृहविभागतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत, त्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस