मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. सरकारने एक-एक दिवसाची मुदतवाढ देऊन काहीही उपयोग नाही. मागण्या मान्य करण्यास जितका विलंब लागेल, तितके मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे म्हणाले की, त्यांच्या आंदोलनाला सध्या केवळ एक दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे, पण मराठ्यांची मुले मोठ्या वेदना घेऊन मुंबईत आली आहेत. "मी खोटे बोलत नाही. आरक्षणाला जसा-जसा विलंब होईल, तसे-तसे लोक आपापली कामे सोडून मुंबईकडे येतील. मंगळवार, बुधवारपासून आणखी मोठ्या संख्येने आंदोलक येणार आहेत. तेव्हा तुम्हाला मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होईल", असा थेट इशारा त्यांनी दिला.
हे आंदोलन केवळ पहिला टप्पा, आणखी टप्पे बाकी!मनोज जरांगे यांनी हे आंदोलन केवळ पहिला टप्पा असल्याचे म्हटले आहे. या आंदोलनाचे एकूण सात ते आठ टप्पे आहेत. "आम्हाला माहिती होते की मुंबईत आम्हाला त्रास दिला जाईल, म्हणूनच आम्ही सध्या कमी संख्येने आलो आहोत. पण आगामी दिवसांत लोकशाही मार्गाने हा लढा अधिक तीव्र होणार आहे," असेही ते म्हणाले.
मला तुरुंगात टाका, गोळ्या घाला, तरीही मागे हटणार नाही!मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत सांगितले की, "तुम्ही मला तुरुंगात टाका. मी तुरुंगातही उपोषण सुरूच ठेवेन. मला गोळ्या घातल्या तरी मी त्या झेलण्यास तयार आहे. सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही."