Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना जन्मदिनी कोट्यवधी मिळाले, पण 'त्या' 101 रुपयांनी डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 15:26 IST

मुख्यमंत्र्यांच्या या संवदेनशील उपक्रम आणि तत्परतेमुळे वेदांतचे कुटुंबीय भारावून गेले होते.

मुंबई - मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर, त्यांच्या सूचनेप्रमाणे राज्यात त्यांचा वाढदिवस साजरा करताना कोट्यवधी रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात जमा झाली आहे. मुख्यमंत्र्याच्या आवाहनानंतर शुभेच्छांसह मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करण्यात आली. त्यानुसार, या तिजोरीत 1 कोटी 75 लाख रुपयांची धनराशी जमा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल राज्याच्या जनतेचे आभार मानले आहेत. मात्र, या 1.75 कोटींपैकी 101 रुपयांचा आलेला निधी मुख्यमंत्र्यांना भावुक करुन गेला.  

औरंगाबाद जिल्ह्यातील कनकोरी (ता.गंगापूर) येथील वेदांत भागवत पवार हा पाच वर्षीय बालक पित्ताशयाच्या कर्करोगाने पिडीत होता. वेदांतचे वडील वाळूज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात तर आई शेतात मजुरी करते. अशा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या बालकाच्या उपचाराचा खर्च पालकांना पेलवणे शक्य नव्हते. त्याच्या पालकांसह नातेवाईकांनी आपल्यापरीने मदत करून त्यावर उपचार सुरू केले. मात्र, या उपचाराचा मोठा खर्च भागविणे अडचणीचे ठरू लागले. पालकांची सारी पुंजी त्यासाठी खर्ची पडली. त्यामुळे पवार कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. या बालकाची आत्या श्रीमती रेणुका सुनील गोंधळी या नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता.नेवासा) येथे राहतात. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मोबाईल दूरध्वनी माध्यमातून मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना संदेश पाठविला. या संदेशाची दखल घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून या बालकावरील उपचारापोटी तात्काळ एक लाख 90 हजारांची मदत करण्यात आली. या मदतीमुळे मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रन रुग्णालयात वेदांतवर उपचार करणे शक्य झाले. त्यामुळे या बालकाला जीवनदान मिळण्यास मदत झाली.

मुख्यमंत्र्यांच्या या संवदेनशील उपक्रम आणि तत्परतेमुळे वेदांतचे कुटुंबीय भारावून गेले होते. त्यामुळेच, मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्रीमती रेणुका गोंधळी यांनी आपल्या मजुरीच्या पैशातील 101 रुपये मनिऑर्डरने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठविले. तसेच, एका भावनिक मेसेजही त्यांनी दिला आहे. 

“आपण माझ्या मोबाईलवरील संदेशाची दखल घेऊन माझ्या भाच्याला जीवनदान दिले. अशीच सेवा आपल्या हातून इतर सामान्यांची घडो यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून माझ्या मजुरीतील अल्प स्वरुपातील रक्कम मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठवित आहे. आपणास परमेश्वर मोठे आयुष्य देवो, या राष्ट्राची सेवा करण्याचे भाग्य लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना.” 

वेदांच्या आत्याने लिहिलेल्या या भावनिक मेसेजमुळे मुख्यमंत्री भावूक झाले होते. त्यामुळेच, राज्यभरातून आलेल्या 1.75 कोटी रुपयांबद्दल मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले. मात्र, या 1.75 कोटी रुपयांपैकी आलेल्या 101 रुपयांनी मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्रीमुंबई