Join us

मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 09:46 IST

सरन्यायाधीशांच्या नाराजीनंतर तिन्ही अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली...

मुंबई : सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच भेटीत स्वागत करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त अनुपस्थित राहिल्याने न्या. भूषण रा. गवई यांनी रविवारी एका कार्यक्रमात तीव्र नाराजी व्यक्त केली. सरन्यायाधीश गवई बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवातर्फे आयोजित सत्कार समारंभाला उपस्थित होते. सरन्यायाधीशांच्या नाराजीनंतर तिन्ही अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

माझ्या जागी अन्य कुणी असता तर...प्रोटोकॉलचे पालन करण्याचा आग्रह मी धरत नाही. इतक्या किरकोळ बाबींमध्ये पडायचे नसले तरी लोकांना त्याबाबत माहिती म्हणून हे नमूद करत आहे.माझ्या जागी अन्य कोणी असते, तर राज्यघटनेचा अनुच्छेद १४२ चा वापर केला असता, असेही न्या. गवई यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालय या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश देऊ शकते. 

अभिवादन केल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘जे झाले, ते मी कळवले. माझी प्रोटोकॉलबाबत कोणतीही तक्रार नाही.’

टॅग्स :सर्वोच्च न्यायालयमुंबई