लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्यात कैद करण्यात आले होते. मात्र, त्याची पडझड झाली आहे. हा वाडा अधिग्रहित करण्यासाठी सरकार पुढाकार घेईल. येथे छत्रपती संभाजी महाराजांना साजेसे स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली.
नाशिक येथील शिवसृष्टीसंदर्भात आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार अमोल मिटकरी, आमदार निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी, रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील राजमाता जिजाऊंचा राजवाडा अधिग्रहित केला जाईल. ३५० वर्षांपूर्वी तिथे जसा वाडा होता तसाच वाडा करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे सांगितले.
कर्नाटक राज्यात शहाजी महाराज यांची समाधी असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तेथेही योग्य स्मारक बांधावे, अशी सदस्यांनी मागणी केली असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधिस्थळाची डागडुजी करून त्याची योग्य देखभाल करण्यासंदर्भात कर्नाटक सरकारसोबत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.