लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मंत्रिपदाची २० मे रोजी शपथ घेतलेले अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आले आहे. अपारंपरिक ऊर्जा, ओबीसी कल्याण आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्याकडे दिव्यांग कल्याण खाते सोपविण्यात आले आहे.
धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खाते भुजबळ यांना दिले जाईल, असे मानले जात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेच खाते भुजबळ यांच्याकडे सोपविले आहे. अतुल सावे यांच्याकडे दिव्यांग कल्याण खाते सोपविण्यात आल्याने त्यांच्याकडे चार खात्यांचा कार्यभार असेल.
दिव्यांग कल्याण हे खाते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे होते. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते फडणवीस यांच्याकडे गेले. फडणवीस यांनी आता आपल्याकडील हे खाते सावे यांच्याकडे सोपविले आहे.
‘एरवी नाशिकचे पालकत्व माझ्याकडेच!’
भुजबळ यांना मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावरील दालन देण्यात आले आहे. हे दालन आधी धनंजय मुंडे यांच्याकडे होते. ‘नाशिकचे पालकमंत्रिपद मिळावे, ही माझी महत्त्वाकांक्षा नाही; पण एरवी नाशिकचे पालकत्व माझ्याचकडे आहे ना! अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.
मी राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री, भाजपचा मंत्री नाही
मला मंत्रिमंडळात स्थान मिळाले यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते, हे खरे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीसुद्धा माझ्यासाठी प्रयत्न केले. पण असे असले तरी मी राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री झालो आहे.
मी भाजपचा मंत्री नाही, असे उत्तर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना दिले. धनंजय मुंडे यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते निर्दोष असल्याचे स्पष्ट होईल व नंतर निश्चितपणे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाईल, याची खात्री आहे, असेही भुजबळ म्हणाले.