Join us  

'फिफ्टी-फिफ्टी'साठी अडून बसलेल्या शिवसेनेला छगन भुजबळांचा मोलाचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 4:14 PM

शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक सुरू आहे.

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनाला एक मोलाचा सल्ला दिला आहे. छगन भुजबळ यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी अडून राहण्याची 'हीच ती वेळ' असल्याचे म्हटले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक सुरू आहे. या बैठकीला जाताना प्रसार माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शिवसेनेसाठी हीच ती वेळ आहे. त्यांनी आपल्या मागणीवर ठाम राहिले पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. या बैठकीला जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे उपस्थित आहेत. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा पाहिजे, म्हणून शिवसेना अडून बसली आहे. तर भाजपानेही आक्रमक होत मुख्यमंत्रीपदावर कोणतीही तडजोड करायची नाही, यावर ठाम भूमिका घेतली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. 

टॅग्स :छगन भुजबळभाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस