चेंबूर रेल्वे स्थानकाच्या फलाटांची उंची ठरतेय धोकादायक

By Admin | Updated: August 4, 2014 01:30 IST2014-08-04T01:30:29+5:302014-08-04T01:30:29+5:30

चेंबूर रेल्वे स्थानकावरील फलाटांच्या कमी उंचीमुळे या रेल्वे स्थानकात नेहमीच अपघात घडत असतात.

Chembur railway stations have high platforms, they are dangerous | चेंबूर रेल्वे स्थानकाच्या फलाटांची उंची ठरतेय धोकादायक

चेंबूर रेल्वे स्थानकाच्या फलाटांची उंची ठरतेय धोकादायक

चेंबूर : चेंबूर रेल्वे स्थानकावरील फलाटांच्या कमी उंचीमुळे या रेल्वे स्थानकात नेहमीच अपघात घडत असतात. आजवर अनेक प्रवाशांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले असून, अनेकांना अपंगत्वही आले आहे.
सीएसटी व पनवेल स्थानकांतून भरगच्च आलेली लोकल ट्रेन अर्धीअधिक चेंबूर रेल्वे स्थानकातच रिकामी होते. या रेल्वे स्थानकाचा फायदा घाटला, पी.एल. लोखंडे मार्ग, खारदेवनगर, वाशीनाका, माहूल गाव, गडकरी खाण, प्रियदर्शर्नी, आरसीएफ, बीपीसीएल वसाहत व इतर भागांतील हजारो प्रवाशांना होतो. तरी रेल्वे प्रशासनाने या स्थानकामधील सुख-सुविधांकडे कायमच दुर्लक्ष केल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येते.
या स्थानकावरील दोन्ही फलाटांची उंची कमी असल्याने प्रवाशांना या स्थानकात चढताना आणि उतरताना अक्षरश: जीव मुठीत घ्यावा लागतो. ट्रेन आणि फलाटात मोठी गॅप असल्याने गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यांना लोकलमध्ये चढणे व उतरणे अत्यंत धोकादायक झाले आहे.
शहरातील ज्या फलाटांची उंची कमी आहे, अशा फलाटांची उंची लवकरच वाढवण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले आहे. प्रत्यक्षात मात्र अद्यापही चेंबूर रेल्वे स्थानकामध्ये उंची वाढवण्याबाबत रेल्वेकडून काहीच हालचाली होत नसल्याबद्दल प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chembur railway stations have high platforms, they are dangerous