Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत केली फसवणूक; खेरवाडी पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 00:31 IST

‘आश्रय’ सामाजिक संस्था प्रमुखाला अटक

मुंबई : कस्टम ड्युटी चुकवून आणलेले सोने कमी भावात विकण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी वाकोल्यातील समाजसेवकाला खेरवाडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्या अन्य पाच साथीदारांना यापूर्वीच गजाआड केले आहे.

लक्ष्मण चिकय्या पुजारी उर्फ एल. सी. पुजारी (५६) असे अटक केलेल्याचे आहे. त्याची वाकोल्यात आश्रय ही सामाजिक संस्था असून, त्याचे फेसबुकवर शेकडो फॉलोअर्स आहेत. एका व्यक्तीला कमी किमतीत सोने विकण्याचे आमिष देऊन त्याला २७ लाख रुपये आणण्यास सांगितले. त्याच्याच आयकर अधिकारी असल्याची बतावणी करत ते पैसे घेऊन पसार झाले.

खेरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि त्यांचे पथक या प्रकरणी चौकशी करत होते. तांत्रिक तपास करत पुजारीच्या मुसक्या खेरवाडी पोलिसांनी आवळल्या. त्याच्यावर बीकेसी, तसेच माहिम पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सुट्ट्या पैशांच्या बदल्यात बंदे पैसे देऊन काही टक्के अधिक कमिशनच्या स्वरूपात देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या टोळीचा पदार्फाश करण्यात खेरवाडी पोलिसांना यश मिळाले. यापूर्वी याच टोळीच्या गोडविन अमन्ना (५०), संजू सानप (४७), विष्णू गौडा (३३), बाळा कुबल (४९) आणि रवींद्र झणके (५१) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :धोकेबाजीपोलिसअटक