जास्त बिल दाखवून विकायचा स्वस्त मोबाइल, रस्त्यावर अडवून फसवणूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:37 IST2025-02-01T14:37:19+5:302025-02-01T14:37:47+5:30
जास्त रकमेच्या बनावट बिलाद्वारे स्वस्तातील मोबाइल विक्री करत लोकांची फसवणूक करणाऱ्या एकाला पवई पोलिसांनी अटक केली

जास्त बिल दाखवून विकायचा स्वस्त मोबाइल, रस्त्यावर अडवून फसवणूक!
जास्त रकमेच्या बनावट बिलाद्वारे स्वस्तातील मोबाइल विक्री करत लोकांची फसवणूक करणाऱ्या एकाला पवई पोलिसांनी अटक केली. राहुल पवार (२६) असे त्याचे नाव असून तो मूळचा संभाजीनगरचा रहिवासी आहे.
एका महिलेसोबत आरोपी रस्त्यात लोकांना अडवायचा. 'मी कुटुंबासह मुंबईत काम करायला आलो. पण कामही मिळाले नाही आणि आता पैसेही संपले आहेत. माझा मुलगा खूप आजारी आहे. माझ्याकडे बिलासह असलेला मोबाइल विकायचा आहे. तुम्ही तो खरेदी करुन पैसे दिलेत तर मला गावाला जाता येईल', असे आवाहन तो करायचा. पवई पोलिसांच्या हद्दीत १८ जानेवारी रोजी ये-जा करणाऱ्यांना अशाच पद्धतीने तो मोबाइलची विक्री करताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता झडतीमध्ये त्याच्याकडे एक स्वस्तातला मोबाइल आणि मोठ्या रकमेची पावती मिळाली.
पोलीस चौकशी झाला उलगडा
पोलीस चौकशीत त्याने पावतीत जास्त किमतीचा उल्लेख असलेला मोबाइल एका व्यक्तीला विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस ठाण्यात बोलवले असता त्यालाही तसाच स्वस्तातील मोबाइल विकल्याचे स्पष्ट झाले.
परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयदीप गोसावी (गुन्हे), सहायक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, उपनिरीक्षक सविता माने, हवालदार तानाजी टिकेकर, बाबू हेगडे, आदित्य झेंडे, संदीप सुरवाडे आणि शिपाई सूर्यकांत शेट्टी यांनी याप्रकरणी तपास केला.
दुकान एक, पत्ते अनेक
पवारकडील मोबाइलच्या पावत्या या कृष्णा मोबाइल शॉपच्या नावे होत्या. मात्र हे दुकान विविध पत्त्यांवर नोंदवण्यात आल्याचे उघड झाले. तपासात हे पत्ते अस्तित्वातच नसल्याचे समोर आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.