ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 05:59 IST2025-07-08T05:58:59+5:302025-07-08T05:59:29+5:30

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सध्या दररोज १८१० लोकल फेऱ्या चालवल्या जातात. त्यांतून ३५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.

Change office timings, reduce local rush; Central Railway sends request to 800 offices | ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

महेश कोले

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबईतील शासकीय आणि खासगी अशा ८०० पेक्षा जास्त कार्यालयांना कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्याबाबत पत्र पाठवले आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत उपनगरीय लोकलमधील गर्दीची समस्या सोडवण्यासाठी कार्यालयीन वेळांत टप्प्याटप्प्याने बदल करण्यासाठी राज्य सरकारनेही या विषयात हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे. 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सध्या दररोज १८१० लोकल फेऱ्या चालवल्या जातात. त्यांतून ३५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. ही सर्वांत स्वस्त आणि जलद वाहतूक सेवा असल्याने गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते ठाणे परिसरातील विविध सरकारी कार्यालये आणि विविध खासगी कार्यालये यांच्या वेळांत नियोजनाचा अभाव आहे. परिणामी सर्व उपनगरी लोकल गाड्यांना सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी होते. या गर्दीचे विभाजन करून ती कमी करण्यासाठी, कार्यालयीन वेळांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचेही पत्रात नमूद 
केले आहे.

... यांनी वेळांत बदल करावेत
केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेस, विविध महामंडळे, मंडळे, बँका, महापालिका, महाविद्यालये, इत्यादींनी कार्यालयीन वेळेत टप्प्याटप्प्याने बदल करण्याचा विचार करावा, असे पत्रात सुचवले आहे. 

नव्या रेल्वे मार्गिकेसाठी जागाच नाही 
बहुसंख्य मुंबईकर काम-धंद्यासाठी दररोज दूरपर्यंत प्रवास करतात. परिणामी लोकलवरील ताण वाढत आहे. या गर्दीची विभागणी करण्याच्या दृष्टीने लोकल सेवांमध्ये वाढ करण्यासाठी नवीन मार्गिका तयार करणे आवश्यक आहे; परंतु सीएसएमटी ते कल्याणपर्यंत नवी रेल्वे मार्गिका टाकण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे नजीकच्या काळात तरी सेवांमध्ये वाढ होणे अपेक्षित नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेत बदल करणे आवश्यक असल्याचे पत्रामध्ये म्हटले आहे. 

Web Title: Change office timings, reduce local rush; Central Railway sends request to 800 offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.