Change Investigation Officer in Pansare murder case; Demand for family members | पानसरे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी बदला; कुटुंबीयांची मागणी
पानसरे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी बदला; कुटुंबीयांची मागणी

मुंबई : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचे तपास अधिकारी बदलावेत, यासाठी पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालायत अर्ज केला आहे. उच्च न्यायालयाने असा अर्ज न करण्याची सूचना पानसरे कुटुंबीयांना यापूर्वी केली होती. मात्र, तरीही शुक्रवारी त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात अर्ज केला.

१६ फेब्रुवारी, २०१६ रोजी कोल्हापूर येथे पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारच्या सीआयडी विभागाची एसआयटी करत आहे. एसआयटीचे अधिकारी ज्या पद्धतीने तपास करत आहेत, त्याबाबत आपण समाधानी नाही, असे पानसरे यांच्या कुटुंबीयांनी अर्जात म्हटले आहे. त्यावर न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने म्हटले की, या अर्जामुळे तपासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पानसरे कुटुंबीयांच्या या अर्जावर एसआयटी १९ डिसेंबर रोजी उत्तर देईल, अशी माहिती एसआयटीतर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी यांनी न्यायालयाला सांगितले.

२० ऑगस्ट, २०१३ रोजी दाभोलकर यांची पुणे येथे हत्या करण्यात आली. शरद कळस्कर, सचिन अंदुरे यांनी दाभोलकर यांची हत्या केल्याचा सीबीआयचा दावा आहे. गेल्या वर्षी एटीएसने कळस्करला अटक केली. त्याच्या चौकशीतून अंदुरेचे नाव पुढे आले. सीबीआय चौकशीदरम्यान अंदुरेने आपणच दाभोलकरांची हत्या करून बंदूक ठाण्याच्या खाडीत टाकल्याची माहिती सीबीआयला दिली, तर शस्त्र शोधण्यासाठी सीबीआयने परदेशातून तज्ज्ञ पाणबुड्या मागविल्या. या पाणबुड्या बंदुकीचा शोध घेत आहेत.

बंदूक शोधण्यासाठी मुदत
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदूक ठाण्याच्या खाडीतून शोधण्यात येत आहे. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे ठाण्याच्या खाडीत शस्त्र शोधण्याकरिता तज्ज्ञांच्या पथकाला केवळ १२ दिवस मिळाले. या कामासाठी आणखी ४५ दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शस्त्र शोधण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती सीबीआयतर्फे अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी खंडपीठाला केली.

Web Title: Change Investigation Officer in Pansare murder case; Demand for family members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.