कागदपत्रांविना करा ‘आधार’मध्ये बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 06:19 IST2019-09-18T06:19:27+5:302019-09-18T06:19:37+5:30
आधार नोंदणी, त्यामध्ये अद्ययावतीकरण करणे अनेकांना दिव्य वाटते.

कागदपत्रांविना करा ‘आधार’मध्ये बदल
मुंबई : आधार नोंदणी, त्यामध्ये अद्ययावतीकरण करणे अनेकांना दिव्य वाटते. मात्र आधारमधील माहितीचे अद्ययावतीकरण अत्यंत सुलभ करणारा निर्णय युनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडिया (आधार) प्रशासनाने घेतला आहे. छायाचित्र, बोटांचे ठसे, डोळ्यांतील बुब्बुळे अशी बायोमेट्रिक वैशिष्ट्ये, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, स्त्री-पुरुष नोंद अशा नोंदीमध्ये बदल करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची गरज भासणार नाही. नोंदणीकृत आधार कार्ड घेऊन अर्जदाराला आधार केंद्रात जाऊन यामधील बदल नोंदवण्यात येईल, असे आधार प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मात्र, आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख बदलायची असल्यास अर्जदाराला त्यासाठी जे नाव व पत्ता द्यायचा असेल त्याचा पुरावा असलेले शासकीय कागदपत्र सादर करणे आवश्यक ठरेल. नावात बदल करण्यासाठी ३१ विविध कागदपत्रांपैकी कोणताही पुरावा चालेल. पत्ता बदलण्यासाठी ४४ विविध कागदपत्रांपैकी कोणताही पुरावा चालेल, तर जन्मतारीख बदलण्यासाठी १४ विविध कागदपत्रांपैकी कोणताही पुरावा चालेल, असे आधारने स्पष्ट केले.