Chandrakant Khaire News: मला आमंत्रण नव्हते, पत्रिकेत माझे नाव नव्हते. मला डावलून कसे चालेल. उद्धव ठाकरे संकटात आहेत, एकत्र येऊन काम करावे लागेल. मेळाव्याचे अंबादास दानवेनी मला सांगितले नाही. मी उद्धव साहेबाना सांगणार आहे. तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतो, शिवसेना मी वाढवली. हा नंतर आला आणि काड्या करण्याचे काम करतो. तो मला बोलतच नाही. पक्ष चालवायचा असेल, तर एकत्र राहिले पाहिजे. या माणसांमुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटले, या माणसाने काय केले सांगा. अनेक लोक सोडून जात आहेत, या शब्दांत ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जाहीरपणे अंबादास दानवे यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली.
छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांमधील धुसपूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. एकीकडे ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही, तर दुसरीकडे पक्षांतर्गत कुरघोडी होत असून, नेते एकमेकांबाबत उघडपणे नाराजी बोलून दाखवत असल्याने ठाकरे गटात सारेकाही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी थेट मुंबई गाठली आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर अंबादास दानवे यांच्यासोबत असलेला वाद मिटल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते.
अंबादास दानवे आणि माझा वाद केव्हाच मिटला
उद्धव ठाकरे यांची भेट झाली. काही कार्यक्रमासंदर्भात चर्चा झाली. काही कार्यक्रम पक्षाकडून आखले जाणार आहेत. त्याबाबत त्यांच्याशी बोलणे झाले. अंबादास दानवे आणि माझा वाद केव्हाच मिटला आहे. यापुढे आम्ही दोघे मिळून एकत्र कार्यक्रम करणार आहोत, तो एकटा किंवा मी एकटा कार्यक्रम करणार नाहीत, सोबत म्हणून कार्यक्रम करणार आहोत. सेना भवनला एक बैठक असेल, मी आणि अंबादास दानवे सोबत बैठकीला असणार आहोत, असे चंद्रकांत खैरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंना मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि आता वाद मिटलेला आहे. १५ जूनला उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर येथे येणार आहेत. शिवसेना भवनचे उद्घाटन आहे, याशिवाय शिबिर घेतील. आदित्य ठाकरेही येणार असल्याची माहिती खैरे यांनी दिली.