Join us  

कोचर दाम्पत्य, धूत यांना २८ पर्यंत सीबीआय कोठडी; सीबीआयने ५ वर्षे मौन बाळगल्याचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 5:11 AM

चंदा कोचर आणि धूत यांना एकमेकांसमोर बसवून चौकशी करायची आहे, असे सीबीआयने विशेष न्यायालयाला सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयसीआयसीआय बँक व व्हिडीओकॉन कर्ज फसवणूकप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आयआयसीआयच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर तसेच व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना २८ डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. 

चंदा कोचर आणि धूत यांना एकमेकांसमोर बसवून चौकशी करायची आहे, असे म्हणत सीबीआयने विशेष न्यायालयाला तिघांनाही तीन दिवसांची कोठडी सुनावण्याची विनंती केली. त्यावर कोचर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी आक्षेप घेतला. हे २०१७चे प्रकरण आहे. सीबीआयने पाच वर्षे मौन का बाळगले, ईडीकडून दीपक यांची चौकशी सुरू होती त्यावेळी सीबीआयने चौकशी का केली नाही, दीपक यांच्या मुलाचे लग्न १५ जानेवारीला होणार असताना ही कारवाई केल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. 

धूत यांची कोठडी मागताना सीबीआयने सांगितले की, धूत यांनी सत्य माहिती दिलेली नाही. त्यामुळे तिघांनाही एकमेकांसमोर बसवून चौकशी करावी लागेल. न्यायालयाने सीबीआयचे म्हणणे मान्य करत तिघांनाही २८ डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :गुन्हा अन्वेषण विभागचंदा कोचरआयसीआयसीआय बँक