मुंबईतल्या 'या' मतदारसंघातून आठवले लढवणार लोकसभा, सेनेला देणार आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 21:31 IST2018-07-31T21:29:34+5:302018-07-31T21:31:20+5:30
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

मुंबईतल्या 'या' मतदारसंघातून आठवले लढवणार लोकसभा, सेनेला देणार आव्हान
नवी दिल्ली- राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले 2019ची लोकसभा निवडणूक दक्षिण मध्य मुंबईतून लढणार आहेत.
रामदास आठवलेंनी वांद्रे (पूर्व) येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर ही घोषणा केली आहे. तसेच आठवलेंनी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावाही घेतलाय. मतदारसंघात स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सूचनाही आठवलेंनी यावेळी दिल्यात.
दक्षिण मध्य मुंबईतून सध्या शिवसेनेचे राहुल शेवाळे खासदार आहेत. त्यामुळे या जागेवरून आरपीआय आणि शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 2019ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. शिवसेना भाजपासोबत सत्तेत सहभागी असली तरी युती करून निवडणुका लढवणार नाही. त्यामुळे भाजपानं शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी रामदास आठवलेंना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी दिली तर नाही ना, राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलं आहे.