भुजबळ कुटुंबीयांच्या दोषमुक्ततेला आव्हान; अंजली दमानिया यांची हायकोर्टात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 09:06 IST2022-01-14T09:06:31+5:302022-01-14T09:06:55+5:30
विशेष न्यायालयाला हा खटला जलदगतीने पूर्ण करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी दमानिया यांनी याचिकेद्वारे केली आहे.

भुजबळ कुटुंबीयांच्या दोषमुक्ततेला आव्हान; अंजली दमानिया यांची हायकोर्टात याचिका
मुंबई : दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी राज्याचे मंत्री छगन भुजबळांसह त्यांच्या कुटुंबीयांना दोषमुक्त करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांना दोषमुक्त करण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा, तसेच विशेष न्यायालयाला हा खटला जलदगतीने पूर्ण करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी दमानिया यांनी याचिकेद्वारे केली आहे.
विशेष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने सप्टेंबर २०२१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या समीर भुजबळ आणि अन्य पाचजणांची महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी दोषमुक्तता केली. महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करण्याचे कंत्राट दिलेल्या विकासकाकडून आरोपींनी लाच घेतली, हे सिद्ध करण्यासाठी पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत विशेष न्यायालयाने आरोपींची दोषमुक्तता केली.
‘तपास यंत्रणेने आव्हान न दिल्याने केला अर्ज’
दमानिया यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात फेरविचार अर्ज दाखल करीत विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले. तपास यंत्रणेने (एसीबी) अद्याप विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान न दिल्याने आपण हा अर्ज दाखल करीत आहोत, असे दमानिया यांनी अर्जात म्हटले आहे.