Maharashtra Monsoon Session 2025: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात खडाजंगी झाली. आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना चड्डी बनियन गँगचा उल्लेख केला. चड्डी बनियन गँग कुठे जाऊन काहीही करते म्हणत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. यावरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे हे चांगलेच संतापले आणि त्यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून हिंमत असेल तर नाव घेऊन बोला, असं आवाहन केलं. तसेच आदित्य ठाकरेंनी उल्लेख केलेले शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावेत, अशी मागणी निलेश राणेंनी केली.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बनियनवर आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने आदित्य ठाकरे यांनी त्यांना उद्देषून चड्डी बनियान गँग असा उल्लेख केला. मुख्यमंत्री युती धर्म पाळत असल्याने त्यांना कारवाई करता येत नाही. चड्डी बनियन गँग कुठेही जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काहीही करतात, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. त्यावर निलेश राणे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. बोलायला एवढी भीती वाटत असेल तर सभागृहात असे शब्द बोलू नका, हिंमत असेल तर त्यांनी सांगावे की हे शब्द कोणासाठी होते असा सवाल निलेश राणेंनी केली.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
"कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. माझी मुख्यमंत्र्यांसोबत सहानुभूती आहे. त्यांचा युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे. त्यांचा मी आधीच सांगितलं होतं की, अभिनंदन करायचं आहे. यासाठी कारण ते ज्या लोकांसोबत बसले आहेत, जे बाकीच्या गटांमध्ये आहेत, चड्डी बनियान गँग. ते काय करतात? त्याच्यात एक गोष्ट आहे. त्याच्यात काहीही केलं तर चड्डी बनियन गँग कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काहीही करतात. मग ते येऊन काय करतात, त्यांच्यावर कारवाई तर होत नाही. ते मुख्यमंत्र्यांना सांगतात की, पूर्ण चूक माझी नाही. मुख्यमंत्री कारवाई करु शकत नाही," अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
चड्डी कोण बनियान कोण हे एकदा सांगा
"त्यांनी हे जे काही शब्द वापरले, त्यांनी नेमकी कुणावर कारवाई व्हावी हे सांगावं. त्यांची चड्डी कोण बनियान कोण? हे एकदा त्यांनी सांगावं ना. जर नाव घ्यायला भीती वाटत असेल तर सभागृहात असे शब्द वापरू नयेत. जर हिंमत असेल तर ते शब्द कुणासाठी होते हे सांगावं. उगाच काहीही चाललं आहे. उगाच टीका करायची म्हणून काहीही. आम्ही एक तासापासून ऐकतोय. काही बोललो नाहीत. मी एक शब्द मध्ये बोललेलो नाही. पण हे कोणते शब्द आहेत? कामाकाजातून हे शब्द काढून टाका. किंवा ते नेमकं कुणाबद्दल बोलत होते ते त्यांनी स्पष्ट करावं," असं निलेश राणे म्हणाले.