रायगडमधील श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनला केंद्राचा ‘प्रसाद’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:14 IST2025-06-12T12:13:56+5:302025-06-12T12:14:47+5:30
Raigad News: रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन या पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठीचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ (तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियान) योजनेत समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

रायगडमधील श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनला केंद्राचा ‘प्रसाद’
मुंबई - रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन या पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठीचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ (तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियान) योजनेत समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
मंत्रालयात बुधवारी या संदर्भात बैठक पार पडली. बैठकीला पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार सुनील तटकरे तसेच विविध विभागांचे अधिकार उपस्थित होते. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करतानाच पर्यटन विकास आराखड्यांसाठी आवश्यक मंजुरीचे टप्पे पूर्ण करून कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर, मारळ व श्रीवर्धन येथील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन विकासाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.
२२ कोटी खर्च अपेक्षित
हरेश्वर प्रकल्पासाठी अंदाजे २२ कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच मारळ येथील प्रस्तावित स्टार गेजिंग सुविधा ही रायगड जिल्ह्यातील पहिली प्रगत खगोल निरीक्षण केंद्र असणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे २५ कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. याअंतर्गत पर्यटकांना पारदर्शक गेस्ट डोम्स, कॅम्पिंग, साहसी खेळ, व्याख्यान केंद्र, आणि वनसंपदेसह पर्यटनाचा एकत्रित अनुभव घेता येणार आहे.बैठकीत श्री हरिहरेश्वर मंदिराच्या प्रदक्षिणा मार्ग विकास, प्रस्तावित स्टार गेजिंगचे सादरीकरण करण्यात आले.