अपघातांवर मध्य रेल्वेचे मौन; मुंब्रा, सॅण्डहर्स्ट रोडसारख्या दुर्घटनांवर अधिकाऱ्यांची चुप्पी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:36 IST2025-11-08T10:40:06+5:302025-11-08T14:36:36+5:30
जीएम डीआरएमच्या राजीनाम्याची मागणी

अपघातांवर मध्य रेल्वेचे मौन; मुंब्रा, सॅण्डहर्स्ट रोडसारख्या दुर्घटनांवर अधिकाऱ्यांची चुप्पी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंब्रा आणि सॅण्डहर्स्ट रोडसारख्या दुर्घटनांमध्ये रेल्वे प्रवाशांना प्राण गमवावे लागत असताना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) हिरेश मीना यांनी मात्र मौन बाळगले. प्रवासी संघटना तसेच पत्रकारांना भेटण्यासही दोघांनी शुक्रवारी नकार दिला. तर, दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वेने चौकशी समिती स्थापन केल्याचे सांगितले. तर दुसरीकडे तयार केलेला अहवाल सामान्य प्रवाशांकडेही सादर केला नाही. त्यातच लोहमार्ग पोलिसांनी त्यांचा स्वतंत्र अहवाल तयार करत रेल्वे अभियंत्यांवर गुन्हा दाखल केला. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी आंदोलन केले आणि प्रवाशांचा जीव गेला. यावर जीएम आणि डीआरएम यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी मौन बाळगले.
जीएम डीआरएमच्या राजीनाम्याची मागणी
मध्य रेल्वेचे जीएम आणि मुंबई विभागाचे डीआरएम हिरेश मीना यांनी त्यांच्या देखरेखीखाली रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या गैरवर्तन तसेच सीएसएमटी रेल्वे स्थानकावर झालेल्या बेकायदेशीर कृत्यांसाठी जबाबदार धरून राजीनामा देण्याची मागणी ॲड. कांचन घनशानी यांनी समाज माध्यमांवर केली. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुंब्रा येथील अपघातात पाच प्रवाशांच्या मृत्यूप्रकरणी रेल्वे पोलिसांनी प्रथमदर्शनी पुराव्याच्या आधारे दोन रेल्वे अभियंत्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आरोपी उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब करू शकतात. परंतु अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात बेपर्वा वागणुकीमुळे आणखी दोन प्रवाशांचे जीव गेले, असेही ॲड. घनशानी यांनी म्हटले आहे.
पत्रकारांनी शुक्रवारी विवेक कुमार यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या कार्यालयाचे दार बंद करत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. तर हिरेश मीना यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले. त्यामुळे यावर कोणीच काही बोलत नसल्याचे चित्र होते.