तिकीट काढा, १० हजार मिळवा! मध्य रेल्वेनं सुरू केलेल्या 'लकी ड्रॉ'च्या विजेत्याला पैसे मिळाले का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:37 IST2025-04-02T15:34:35+5:302025-04-02T15:37:04+5:30
मुंबईत लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी व्हावी यादृष्टीकोनातून मध्य रेल्वे प्रशासनाच्या मुंबई विभागाने भाग्यवान प्रवासी योजना सुरू केली.

तिकीट काढा, १० हजार मिळवा! मध्य रेल्वेनं सुरू केलेल्या 'लकी ड्रॉ'च्या विजेत्याला पैसे मिळाले का?
मुंबईत लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी व्हावी यादृष्टीकोनातून मध्य रेल्वे प्रशासनाच्या मुंबई विभागाने भाग्यवान प्रवासी योजना सुरू केली. ज्या अंतर्गत दररोज एक लकी ड्रॉ काढण्यात येणार असून भाग्यवान विजेत्याला १० हजार रुपये आणि आठवड्यातून एकदा ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. लकी ड्रॉ अंतर्गत दररोज एका तिकीटाचा यूटीएस क्रमांक जारी करण्यात येईल. त्या क्रमांचं तिकीट ज्याकडे असेल त्याला १० हजार रुपये जिंकण्याची संधी होती.
मध्य रेल्वेची ही योजना सुरू देखील झाली. लकी ड्रॉ नुसार तिकीटाचा क्रमांक देखील जाहीर करण्यात आला. मात्र, बक्षिसाच्या रकमेसाठी दावेदारच समोर आला नसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई लोकलमधून दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. पण प्रायोगिक तत्त्वावर ही योजना फक्त मध्य रेल्वेवर सुरू करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अंकुश ठेवणे आणि नियमानुसारच प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बक्षीस देण्यासाठी मध्य रेल्वेच्या सहयोगाने भाग्यवान प्रवासी योजना सुरू करण्यात आली.
ही योजना २० मार्चपासून सुरू झाली. www.luckyyatra.com या संकेतस्थळावर विजेते तिकीट क्रमांक घोषीत करण्यात आले आहेत. येथे भेट देऊन विजेता तिकीट क्रमांक आणि प्रवाशांनी घेतलेल्या तिकीटावरील (अनारक्षित तिकीट प्रणालीतील यूटीएस) क्रमांक तपासून बक्षिसासाठी दावा करता येणार आहे. यासाठी संबंधितांचा मोबाइल क्रमांक टाकून ओटीपीद्वारे पडताळणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर विजयी तिकीट अपलोड करुन बक्षिसावर दावा करता येणार आहे.
काय आहे योजना? पाहा व्हिडिओ...
योजनेतील बक्षिसांच्या रकमेवर अद्याप कोणत्याच प्रवाशाने दावा केलेला नाही. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी लोकलमधील स्क्रीन्स आणि निवडक रेल्वे स्थानकांवरील डिजिटल स्क्रीनवर याची माहिती देण्यात येत आहे. तरीही प्रवाशांपर्यंत अद्याप याची माहिती पोहोचली नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विजेते प्रवासी रेल्वेला मिळत नसल्याचं सांगितलं जात आहे.