मुलुंडला रुग्णवाहिका; कांजुरमार्ग, भांडुपमध्ये वानवा, निर्भया कक्षाच्या चावीसाठी स्टेशन मास्तरकडे फेऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 12:26 IST2025-10-27T12:26:03+5:302025-10-27T12:26:22+5:30
मुलुंड स्थानकात फलाट क्रमांक १ वर निर्भया कक्ष असून, तिथे महिला बाळांना स्तनपान करू शकतात.

मुलुंडला रुग्णवाहिका; कांजुरमार्ग, भांडुपमध्ये वानवा, निर्भया कक्षाच्या चावीसाठी स्टेशन मास्तरकडे फेऱ्या
मुंबई :मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांपैकी केवळ मुलुंड स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बाहेर रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध आहे. अन्य दोन ठिकाणी ती नसल्याने आपत्कालीन प्रसंगी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे कठीण होत आहे. मात्र, वन रूपी क्लिनिक किंवा इतर वैद्यकीय मदत स्थानकात उपलब्ध नाही.
मुलुंड स्थानकात फलाट क्रमांक १ वर निर्भया कक्ष असून, तिथे महिला बाळांना स्तनपान करू शकतात. मात्र, हा कक्ष बंद ठेवण्यात आला असून, त्याची चावी स्टेशन मास्तरांकडे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या कक्षाचा वापर करण्यासाठी महिलांना प्रत्येकवेळी स्टेशन मास्तर कार्यालय गाठावे लागते.
महिला प्रवाशांकडे शौचालयाच्या सुविधेसाठी पाच रुपये आकारले जातात, खरे तर महिला असो किंवा पुरुष प्रवासी सर्व प्रवाशांना ही सुविधा स्वच्छ व विनामूल्य उपलब्ध असण्याची गरज आहे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
प्रथमोपचार पेटीबाबत अनभिज्ञता
भांडुप स्थानकात पूर्वी असलेले वन रूपी क्लिनिक बंद झाले आहे. स्थानकावर जीआरपी, आरपीएफची एकही महिला कर्मचारी दिसली नाही. मात्र, जीआरपी महिला कर्मचारी उपलब्ध असल्याची माहिती पुरुष कर्मचाऱ्याने दिली. वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगांसाठी प्रथमोपचार पेटी स्थानक प्रमुखांकडे आहे, असे सांगण्यात आले. मात्र, सर्वसाधारण प्रवाशांना याबाबतची माहिती नसते.
'दिवे सुरूच ठेवा'
शेवटची लोकल जाईपर्यंत दिवे बंद करू नयेत व पहिली लोकल येण्यापूर्वी दिवे सुरू करावेत, अशी मागणी करून त्याची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती प्रवासी महासंघातर्फे देण्यात आली.
वैद्यकीय कक्षाची 'बोंब'
कांजुरमार्ग स्थानकात उतरून अंधेरी सीप्झच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असतानाही येथे कोणताही वैद्यकीय कक्ष किंवा आपत्कालीन मदत केंद्र उपलब्ध नाही. 3 रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी या सुविधा पुन्हा सुरू कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.
भांडुप, कांजूरमार्ग, मुलुंड आणि इतर स्थानकांमध्ये चांगल्या सुविधा पुरविणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. महिला डब्यांजवळ पुरुष पोलिस कर्मचारी कार्यरत असतात, त्याऐवजी महिला कर्मचारी तैनात करण्याची गरज आहे. महिला प्रवाशांच्या समस्यांकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकांत रुग्णवाहिका असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रेणुका साळुंखे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ