दिवाळी, छठ पूजेसाठी ‘मरे’च्या विशेष फेऱ्या; दररोज लाखभर प्रवासी मुंबईतून युपी, बिहारकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 11:29 IST2025-10-22T11:29:59+5:302025-10-22T11:29:59+5:30
२४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत ही गर्दी आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

दिवाळी, छठ पूजेसाठी ‘मरे’च्या विशेष फेऱ्या; दररोज लाखभर प्रवासी मुंबईतून युपी, बिहारकडे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिवाळी व छठ पूजेनिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे १९९८ विशेष फेऱ्या चालवणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी दिली. रोज ४६ गाड्या सोडल्या जात असून त्यात ६ विशेष गाड्या व ४० नियमित गाड्यांचा समावेश आहे. या माध्यमातून दररोज सुमारे १ लाख प्रवासी प्रवास करतात. १९ सप्टेंबरपासून आजपर्यंत मुंबईतून विशेष गाड्यांच्या माध्यमातून सुमारे साडेतीन लाख प्रवासी उत्तर प्रदेश व बिहारला गेले. २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत ही गर्दी आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
६०० पेक्षा अधिक गाड्या मुंबई परिसरातून सुटणाऱ्या असून १०० हून अधिक नियमित गाड्या आणि ८ ते १० विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. या पैकी ७०५ फेऱ्या आधीच पूर्ण झाल्या असून त्यांद्वारे १०.६८ लाख प्रवाशांची ने-आण झाली आहे.
नियोजित १९९८ फेऱ्यांद्वारे एकूण सुमारे ३० लाख प्रवाशांना प्रवासाची सुविधा मिळणार आहे. दररोज १५ हून अधिक विशेष गाड्या मध्य रेल्वेतर्फे चालवल्या जात आहेत. २६ ऑक्टोबरपर्यंत २४ गाड्या चालवल्या जातील. आजपासून पुढील तीन दिवस एकूण ७७ विशेष गाड्या चालवल्या जाणार असून त्यापैकी २४ गाड्या मुंबई विभागातून सुटतील. पश्चिम रेल्वेवरून उत्तर प्रदेश व बिहारला गेल्या आठवड्याभरात १५ हजारपेक्षा जास्त प्रवासी गेले आहेत. वांद्रे टर्मिनसवरून दररोज दोन ट्रेन युपी बिहारसाठी सोडल्या जात आहेत.