मध्य रेल्वेची नॉन एसी बंद दरवाजाची लोकल पास की नापास? मुंबईकर प्रत्यक्ष वापरून सांगणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 13:41 IST2026-04-11T13:39:25+5:302026-04-11T13:41:02+5:30
मध्य रेल्वेला मिळणार पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन-एसी लोकल

मध्य रेल्वेची नॉन एसी बंद दरवाजाची लोकल पास की नापास? मुंबईकर प्रत्यक्ष वापरून सांगणार...
महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच स्वयंचलित दरवाजे बंद होणारी नॉन एसी लोकल दाखल होणार आहे. मुंबईतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन प्रवासी वापरात आणल्यावर या लोकलमध्ये सुरक्षितता आणि सुविधाजनक प्रवास अशा दृष्टीने विविध चाचण्या घेण्यात येणार आहेत. मुंबईकर प्रत्यक्ष या लोकलमधून प्रवास करतील आणि त्या प्रवासयोग्य आहेत की नाही, हे सांगतील, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही लोकल चेन्नईतील पेरांबूर येथील ‘इंटीग्रल कोच फॅक्टरी’मध्ये तयार करण्यात आली असून ती मुंबईकडे रवाना झाली आहे. सोलापूर विभागातील स्थानकावर या गाडीचा अधिकृत स्वीकार केला असून येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये तांत्रिक तपासणीसाठी व सेवेत दाखल करण्यासाठी ही गाडी कुर्ला कारशेडमध्ये नेण्यात येणार आहे. चाचणीनंतर या लोकलमध्ये दिसलेल्या उणिवांची नोंद करून त्यानुसार आणखी एक नमुना लोकल तयार करण्यात येणार आहे.
मुंब्रा स्थानकाजवळ जून २०२५ मध्ये ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सप्टेंबरमध्ये लोकल गाड्यांमध्ये बंद दरवाजांची प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पहिला प्रोटोटाइप लवकरच मुंबईत दाखल होणार आहे.
या गोष्टींची होणार तपासणी
- गर्दीच्या वेळी डब्यामध्ये वायुविजन (व्हेंटिलेशन) कसे आहे?
- दरवाजांवर तसेच डब्याच्या आतील भागात किती प्रमाणात दाब पडतो?
- डब्यातील हवेचा दाब संतुलित आहे का?
- कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकला जातो का?
- ऑक्सिजनची पातळी नियंत्रित राहते का?
- दरवाजा उघडण्यासाठी आणि बंद होण्यासाठी किती वेळ लागतो?
ही लोकल मुंबईमध्ये दाखल झाल्यावर रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनकडून (आरडीएसओ) कन्फर्मेटरी ऑसिलोग्राफ कार रन (सीओसीआर) ट्रायल घेण्यात येणार आहेत. विविध चाचण्या घेऊन ती प्रवासी वाहतुकीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र घेण्यात येईल. त्यानंतर ती लोकल मार्गावर चालवण्यात येईल.
-डॉ. स्वप्निल नीला, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे