आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 08:04 IST2025-11-09T08:02:28+5:302025-11-09T08:04:21+5:30
Central Railway Mega block: मध्य रेल्वेमार्फत अभियांत्रिकीआणि देखभाल कामांसाठी रविवारी उपनगरी मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मुख्य आणि हार्बर मार्गावरील गाड्यांची वाहतूक काही काळ विस्कळीत राहील.

आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
मुंबई - मध्य रेल्वेमार्फत अभियांत्रिकीआणि देखभाल कामांसाठी रविवारी उपनगरी मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मुख्य आणि हार्बर मार्गावरील गाड्यांची वाहतूक काही काळ विस्कळीत राहील.
मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहील. सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद गाड्या या काळात माटुंगापासून मुलुंडदरम्यान धीम्या मार्गावरून धावणार आहेत. नियमित वेळेपेक्षा गाड्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या गाड्या मुलुंड स्थानकात पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद गाड्या देखील मुलुंड ते माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर धावतील आणि त्या गाड्यांनाही सुमारे १५ मिनिटांचा विलंब होईल.
ट्रान्स मार्गावरून प्रवासाला मुभा
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान ११.१० ते १६.१० या वेळेत ब्लॉक राहील. सीएसएमटी येथून सुटणाऱ्या वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या तसेच तिकडून येणाऱ्या अप गाड्या रद्द राहतील. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. ठाणे-वाशी/नेरूळ दरम्यान प्रवासाची तात्पुरती परवानगी प्रवाशांना दिली आहे.