मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 06:52 IST2024-11-01T06:51:57+5:302024-11-01T06:52:25+5:30
ठाणे रेल्वे स्थानकात दुपारी अडीच ते चारदरम्यान एसी लोकल रद्द करण्यात आल्या. मात्र त्याची कोणतीही घोषणा न केल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.

मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
मुंबई : मध्य रेल्वेने गुरुवारी दुपारी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय वेळापत्रकामध्ये बदल करत लोकलचे वेळापत्रक रविवारप्रमाणे चालविल्याने प्रवाशांना फटका बसला. यामध्ये काही लोकल उशिराने धावत होत्या, तर काही एसी लोकल रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नियोजनानुसार कामाला निघालेल्या तसेच खरेदीसाठी निघालेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
ठाणे रेल्वे स्थानकात दुपारी अडीच ते चारदरम्यान एसी लोकल रद्द करण्यात आल्या. मात्र त्याची कोणतीही घोषणा न केल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. तासभर लोकलची वाट पाहून प्लॅटफॉर्म बदलण्यात प्रवाशांची दमछाक झाली. याबाबत प्रवाशांनी उपस्थानक व्यवस्थापकांना विचारले असता वेळापत्रक रविवारप्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी खोळंबा झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वेने वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरपर्यंत रविवारप्रमाणे चालविण्यात येणार असल्याचे समाजमाध्यमावर दुपारी १:४५ ला जाहीर केले. परंतु, याबाबत रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. प्रवाशांच्या मते रेल्वेने एक दिवस अगोदर कळविले असते तर प्रवासाचे योग्य नियोजन करता आले असते. सर्व शासकीय कार्यालये आणि बँका सुरू असताना रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकाचा अवलंब कसा केला, असा प्रश्न विचारला जात आहे.
सणासुदीच्या काळामध्ये आणि कोणतीही राज्य शासकीय सुटी नसताना रेल्वेने वेळापत्रक रविवारप्रमाणे चालविणे चुकीचे आहे. तसेच लोकल फक्त नोकरदार वर्गासाठी नसून सामान्य मुंबईकरांसाठीही आहे, हे रेल्वेला का समजत नाही?
- सुभाष गुप्ता,
अध्यक्ष, रेल यात्री परिषद
ठाणे स्टेशनच्या तिकीट काउंटरवर एसी लोकलबाबत चौकशी केली असता ही गाडी प्लॅटफॉर्म नंबर ७ किंवा ८ वरून सुटेल असे सांगण्यात आले. लोकल सुरू असल्याची खात्री करून यूटीएस ॲपद्वारे तिकीटही काढले. मात्र, आता यूटीएसद्वारे तिकीट काढले म्हणून उपप्रबंधक जबाबदारी झटकत आहेत.
- प्रवासी