मध्य रेल्वेची कमाल! भंगार विक्रीतून ४५९.५२ कोटींची कमावले, गेल्या २ वर्षांतील सर्वोत्तम कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 10:44 IST2026-04-02T10:43:40+5:302026-04-02T10:44:34+5:30
Central Railway Scrap Income News: मध्य रेल्वे २०२५-२६ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून अक्षरशः मालामाल झाली.

मध्य रेल्वेची कमाल! भंगार विक्रीतून ४५९.५२ कोटींची कमावले, गेल्या २ वर्षांतील सर्वोत्तम कमाई
Central Railway Scrap Income News: मध्य रेल्वेने “झिरो स्क्रॅप स्टेटस” साध्य करण्याच्या आपल्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. भंगाराचे मौल्यवान, महसूल मिळवून देणाऱ्या मालमत्तेत रूपांतर करणे आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करणे, हे या प्रमुख मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
मध्य रेल्वे २०२५-२६ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून अक्षरशः मालामाल झाली. भंगार विक्रीद्वारे रेल्वेच्या तिजोरीत ४५९.५२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या ४५० कोर्टीचे लक्ष पूर्ण करत गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक कमाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत रेल्वेच्या कार्यशाळा, यार्ड आणि विभागांमध्ये साठलेले अनुपयोगी साहित्य शोधून त्याची विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात आला. या मोहिमेत कुर्ला कटिंग यार्ड, ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप, परळ वर्कशॉप आणि मनमाड वर्कशॉप यांसह सर्व पाच विभागांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली.
तर गेल्या दोन वर्षांतील आपली सर्वोत्तम कामगिरीही नोंदवली
दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत, मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भंगार विक्रीतून ४५९.५२ कोटी रुपयांचा महसूल यशस्वीरित्या प्राप्त केला आहे; ही रक्कम आर्थिक वर्ष २०२३-२४ नंतरची सर्वाधिक कामगिरी ठरली आहे. या यशासह, मध्य रेल्वेने केवळ रेल्वे बोर्डने निश्चित केलेले ४५० कोटी रुपयांचे उद्दिष्टच ओलांडले नाही, तर गेल्या दोन वर्षांतील आपली सर्वोत्तम कामगिरीही नोंदवली आहे.
विविध श्रेणींतील भंगार, टाकाऊ साहित्याची पद्धतशीर विल्हेवाट
विविध श्रेणींतील भंगार आणि टाकाऊ साहित्याची पद्धतशीर विल्हेवाट लावून ही महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य करण्यात आली आहे. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. रेल्वे रूळ भंगार : ४७,५०२ मेट्रिक टन, लोह-धातू भंगार : ३१,२९८ मेट्रिक टन, लोह व्यतिरिक्त-धातू भंगार : ३,६१६ मेट्रिक टन, स्लीपर्स : २,६५,६२५ नग, रोलिंग स्टॉक : ५० लोकोमोटिव्ह्ज, ७८ डबे आणि १३७ वॅगन्स. मध्य रेल्वेच्या भांडार विभागाने कुर्ला कटिंग यार्ड, ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप (नाशिक), परळ वर्कशॉप आणि मनमाड वर्कशॉप यांसारख्या दुर्गम व विखुरलेल्या ठिकाणांसह, मध्य रेल्वेच्या सर्व पाचही विभागांमध्ये पडून असलेला भंगार माल शोधून काढण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अत्यंत सखोल व सुसूत्र मोहिमा हाती घेतल्या आहेत. या केंद्रित प्रयत्नांमुळे विक्री कामगिरीमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे.
भुसावळची उल्लेखनीय कामगिरी
भुसावळ विभागाने १०५.३९ कोटी रुपयांच्या भंगार विक्रीची विक्रमी नोंद केली आहे. त्यानंतर माटुंगा कार्यशाळा (६८.३९ कोटी रुपये), नागपूर विभाग (६४.०२ कोटी रुपये), मुंबई विभाग (५५.४९ कोटी रुपये), पुणे विभाग (५० कोटी रुपये) व उर्वरित रकमेत इतर विभाग व उत्पादन घटकांचा वाटा आहे. रेल्वे मार्गाशी संबंधित जुने रूळ व इतर ट्रॅक साहित्य, ट्रॅक बदलताना काढण्यात आलेले स्लीपर भंगारात विकले गेले. वर्कशॉप व देखभाल प्रक्रियेतून जमा झालेल्या लोखंडी आणि लोखंडी धातूंच्या भंगाराचाही यात समावेश होता.
‘झिरो स्क्रॅप मिशन’
मध्य रेल्वेने वापरात नसलेल्या परंतु कार्यरत असलेल्या संसाधनांचा इष्टतम वापर करण्यावरही लक्ष केंद्रित केले. या संदर्भात, वापरात नसलेले परंतु कार्यरत असलेले एक रोटाटेक प्रिंटिंग मशीन भंगारात टाकण्याऐवजी ८.७५ कोटी रुपयांच्या मूल्याने नाशिक प्रिंटिंग प्रेसकडे यशस्वीरित्या हस्तांतरित करण्यात आले. हा उपक्रम कार्यक्षम संसाधन वापर आणि सुज्ञ निर्णयप्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन करण्याच्या मध्य रेल्वेच्या कटिबद्धतेवर प्रकाश टाकतो. या कामगिरीतून, ‘झिरो स्क्रॅप मिशन’ साध्य करण्याप्रती, तसेच आर्थिक सुज्ञता, कार्यसंचालनातील कार्यक्षमता आणि पर्यावरणीय शाश्वतता यांना चालना देण्याप्रती मध्य रेल्वेची सातत्यपूर्ण कटिबद्धता आणि दृढनिश्चय दिसून येतो.