Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 09:43 IST2025-11-22T09:32:46+5:302025-11-22T09:43:15+5:30
Central Railway Mega Block: बदलापूर स्थानक परिसरात पादचारी पुलाचे गर्डर उभारणीचे काम आज मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे.

Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याणदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १०:४० ते दुपारी ३:४० दरम्यान मेगा ब्लॉक असेल. यावेळी ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान ब्लॉक नसेल. बेलापूर ते पनवेलदरम्यान ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर २२ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत गर्डर उभारण्यासाठी बदलापूर स्टेशन येथे मध्यरात्रीनंतर २ ते ३.३० पर्यंत ब्लॉक राहील.
३५० मेट्रिक टन क्षमतेची क्रेन
बदलापूर स्थानक परिसरात पादचारी पुलाचे गर्डर उभारणीचे काम शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. पादचारी पुलासाठी ३७.२ मीटर लांबीचे १८ स्टील गर्डर उभारण्यात येणार आहे. यासाठी ३५० मेट्रिक टन क्षमतेचे क्रेन वापरण्यात येणार आहे. गर्डर उभारणीसाठी शनिवार, २२ नोव्हेंबरपासून ते ३ डिसेंबरपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
शेवटची कर्जत रात्री ११.३० वाजता
ब्लॉक कालावधीत १२.१२ ची कर्जत-सीएसएमटी अंबरनाथपर्यंत धावेल. कर्जतहून २.३० वाजेला सुटणारी लोकल अंबरनाथ येथून ३.१० वाजता सीएसएमटीसाठी रवाना होईल. दोन्ही दिशेला ही लोकल अंबरनाथ ते कर्जतदरम्यान रद्द राहील. यामुळे सीएसएमटीतून कर्जतपर्यंत ११.३० वा.ची कर्जतपर्यंत जाणारी शेवटची लोकल असणार आहे.
विशेष रात्रकालीन ब्लॉक
२ डिसेंबरपर्यंत घेणार पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स बांधकामात येणारे यांत्रिक अडथळे हटविण्यासाठी मध्य रेल्वेने २१ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक रात्री १:३० ते ३:३० या कालावधीत घेण्यात येणार आहेत. पनवेल आणि कळंबोलीदरम्यान प्लॅटफॉर्म अप आणि डाऊन मार्गिका, ट्रेन उभ्या करण्यासाठी अप आणि डाऊन मार्गिका तसेच इंजिन वळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मार्गिकांवरील वापर पूर्णपणे बंद असेल. २० मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावतील.