मध्य रेल्वेला असाही मिळतो पैसा! भंगार विक्रीतून तिजोरीत ४०४.७२ कोटी जमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 11:01 IST2026-02-16T11:00:39+5:302026-02-16T11:01:24+5:30
रेल्वे प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या “शून्य भंगार” मोहिमेचा या वाढीमध्ये मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. या उपक्रमांतर्गत रेल्वेच्या कार्यशाळा, यार्ड आणि विभागांमध्ये साठलेले अनुपयोगी साहित्य शोधून त्याची विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात आला.

मध्य रेल्वेला असाही मिळतो पैसा! भंगार विक्रीतून तिजोरीत ४०४.७२ कोटी जमा
मुंबई : मध्य रेल्वेने २०२५–२६ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत भंगार विक्रीद्वारे रेल्वेच्या तिजोरीत ४०४.७२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत (फेब्रुवारी २०२५ पर्यंत) मिळालेल्या ३९३.६५ कोटी रुपयांच्या तुलनेत ही २.८१ टक्क्यांची वाढ असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
रेल्वे प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या “शून्य भंगार” मोहिमेचा या वाढीमध्ये मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. या उपक्रमांतर्गत रेल्वेच्या कार्यशाळा, यार्ड आणि विभागांमध्ये साठलेले अनुपयोगी साहित्य शोधून त्याची विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात आला. निकामी व वापरात नसलेल्या साहित्याचे वर्गीकरण करून त्याचे भंगार विक्रीत रूपांतर करण्यात आले, ज्यामुळे महसूल वाढीस हातभार लागला. या मोहिमेत कुर्ला कटिंग यार्ड, ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप, परळ वर्कशॉप आणि मनमाड वर्कशॉप यांसह सर्व पाच विभागांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली. विभागांमधील समन्वय आणि नियोजनबद्ध शोधमोहीमेमुळे मोठ्या प्रमाणात भंगार उपलब्ध झाले.
भुसावळची उल्लेखनीय कामगिरी
विभागनिहाय कामगिरीत भुसावळ विभागाने ९७.७२ कोटी रुपयांची विक्री करून प्रथम स्थान पटकावले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, भंगार व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे केवळ महसूल वाढत नाही तर कार्यशाळा व यार्डमधील जागेचा योग्य वापर, सुरक्षितता आणि स्वच्छतेतही सुधारणा होत आहे. आगामी काळातही ही मोहीम अधिक वेगाने राबवून महसूलवाढ साधण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
अनुपयोगी साहित्यांतून मोठ्या प्रमाणात कमाई
मध्य रेल्वेने विविध प्रकारच्या निकामी साहित्याची विक्री करून उल्लेखनिय महसूल मिळवला. यात मोठ्या प्रमाणावर रेल्वे मार्गाशी संबंधित जुने रुळ व इतर ट्रॅक साहित्याचा समावेश होता. तसेच ट्रॅक बदलताना काढण्यात आलेले स्लीपर (पटरी तळमांड) भंगारात विकले गेले.
वर्कशॉप व देखभाल
प्रक्रियेतून जमा झालेल्या लोखंडी आणि लोखंडी धातूंच्या भंगाराचाही यात समावेश होता. याशिवाय सेवा पूर्ण केलेली इंजिने, प्रवासी डबे आणि मालवाहू डबे विकण्यात आले.
या सर्व घटकांमधून भंगार व्यवस्थापनाचे प्रमाण, ट्रॅक नूतनीकरणाची व्याप्ती आणि अनुपयोगी मालमत्तेचे आर्थिक रूपांतर व्यापक पातळीवर करण्यात आले आहे, याचे चित्र स्पष्ट होते.