Join us  

राज ठाकरेंना वऱ्हाडी झटका; नितीन गडकरींनी पाठवली विकासकामांची मोठ्ठी यादी

By यदू जोशी | Published: March 23, 2018 1:24 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवलेल्या यादीमध्ये या बाबींचा आहे समावेश

मुंबई -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी फक्त आकडेवारी देतात, बुडबुडे उडवतात, कामें कुठे आहेत, असा सवाल करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना गडकरींनी आपल्या खात्यामार्फत महाराष्ट्रात आणि देशात होत असलेल्या विकासकामांची भली मोठी यादीच पाठवून दिली आहे. कृष्णकुंजवर पाठवण्यात आलेल्या या यादीत गडकरींनी पूर्ण झालेली कामे, सुरू असलेली कामे, हाती घेण्यात येणार असेलली कामे असा सगळा तपशील देण्यात आला आहे. कोणत्या कामांवर किती निधी खर्च झाला आहे, किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, याचा कामनिहाय तपशील देखील गडकरी यांनी राज यांच्याकडे पाठवला आहे. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील कामे आहेत. 

परवापर्यंत गडकरी यांचे प्रशंसक असलेले राज यांनी ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात गडकरी यांच्यावर तोफ डागली होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून गडकरींनी देशभर कामाचा सपाटा लावलेला असताना, राज यांनी गडकरींवर निशाणा साधल्याने आश्चर्यही व्यक्त करण्यात येत होते. 

आपल्या पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात आपण महाराष्ट्रात साडेपाच लाख कोटी रुपयांची कामे करून दाखवू आणि त्यातले एकही काम झाले नाही तर तुम्ही माझ्याविरुद्ध 'ब्रेकिंग न्यूज' बनवा, असे आव्हान गडकरी यांनी अलीकडे मुंबईत आयोजित वार्तालाप कार्यक्रमात दिले होते. 

सूत्रांनी सांगितले की, राज यांच्याशी वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध असताना त्यांनी केलेल्या टीकेने गडकरी व्यथित झाले. त्यांनी त्यांच्या खात्यामार्फत होत असलेल्या विकासकामांची यादी तयार केली आणि ती गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी राज यांच्याकडे पाठवली. या वृत्तास गडकरी यांच्या कार्यालयाने दुजोरा दिला. ही यादी वाचल्यानंतर आता राज काय प्रतिक्रिया देतात याबाबत उत्सुकता आहे.

नेमके काय म्हणाले होते राज ठाकरे?

गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रत्येक जाहीर कार्यक्रमात आश्वासने देत फिरणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही समाचार घेतला होता. नितीन गडकरी हे सरकारी योजनांबाबत वाट्टेल ते आकडे सांगतात. ते एखाद्या लहान मुलाप्रमाणे साबणाचा फेस आणि नळीच घेऊन फिरत असतात. कुठेही गेले एक लाख कोटी, दोन लाख कोटींचे फुगे उडवतात. मात्र, हे सर्व प्रकल्प हाती घ्यायला सरकारकडे तेवढा निधी आहेच कुठे?, असा सवाल राज यांनी विचारला. राज यांच्या या वक्तव्यानंतर प्रेक्षकांनीही 'फूSSफूSSफू', असा आवाज काढून गडकरींची खिल्ली उडविली.

टॅग्स :राज ठाकरेनितिन गडकरीमनसे