सर्व रुग्णालयांत अवयवदानाकरिता स्वतंत्र पथक नेमा, केंद्राचे राज्य सरकारांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 07:29 IST2025-10-22T07:27:18+5:302025-10-22T07:29:56+5:30
गेल्या काही वर्षांत अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत.

सर्व रुग्णालयांत अवयवदानाकरिता स्वतंत्र पथक नेमा, केंद्राचे राज्य सरकारांना निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विविध राज्यांतील प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्व रुग्णालयांमध्ये संभाव्य अवयव दात्यांच्या कुटुंबीयांना समुपदेशन करणारे स्वतंत्र पथक नेमण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. रुग्णालयांना मृत्यूंची नोंद करणे, वेळेत कुटुंबीयांचे समुपदेशन करणे आणि अवयव तसेच उती दानासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. त्यामुळे अवयव निकामी झालेले रुग्ण अवयव मिळावेत म्हणून प्रतीक्षा यादीत नोंद करून ठेवत आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबई विभागाच्या केंद्रात नोंदविले जात आहेत. यामध्ये ३ हजार ८०० हून अधिक रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अवयवदान गरजेचे आहे.
पथकाला माहिती देणे बंधनकारक
राष्ट्रीय अवयव व उती प्रत्यारोपण संस्था (नोटो) ही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत स्थापन केलेली राष्ट्रीय संस्था आहे. ‘नोटो’चे डॉ. अनिल कुमार यांनी १७ ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, रुग्णालयांनी मेंदू-मृत्यू समितीच्या सदस्यांबरोबरच प्रत्यारोपण समन्वयक किंवा समुपदेशक यांना समाविष्ट करून अवयव व उती दान पथक तयार करणे अत्यावश्यक आहे. या पथकाला रुग्णालयात होणाऱ्या सर्व मृत्यूंची माहिती देणे बंधनकारक आहे. जर कुटुंबीयांनी अवयवदानास नकार दिला, तरी त्यांना उती दानाची संधी दिलीच पाहिजे.
एक दाता वाचवेल तब्बल आठ जणांचे प्राण
मेंदू मृत झालेल्या व हृदयविकारामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांकडून तसेच नैसर्गिक मृत्यू झालेल्या प्रकरणांमध्येही डोळे, त्वचा, हाडे आणि हृदयाच्या झडपा यांसारखी उती दान करता येतात. मृत्यूनंतर १० तासांपर्यंत उतीचे संकलन करता येते. एक दाता आठ जणांचे प्राण वाचवू शकतो.
भारताला दरवर्षी जवळपास एक लाख नेत्रदानांची गरज आहे; परंतु सध्या केवळ एक तृतीयांश गरजच भागवली जाते. विशेषतः हाडांचे दान हे अपघात, हाडांच्या फ्रॅक्चरचे न भरून येणे, जन्मजात दोष आणि इतर हाडांच्या विकारांवर उपचार करण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरते, असेही डॉ. अनिल कुमार यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.