Join us

शेतकरी, नोकरदारांना केंद्र सरकारने मदत करावी; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 06:36 IST

अमेरिकेने ७५ हजार डॉलरपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला १,२०० डॉलर्स रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली आहे.

मुंबई : देशातील ११ कोटी कामगार, तेरा लाख शेतकरी आणि हजारो नोकरदारांना अन्य देशांप्रमाणे केंद्र सरकारने देखील त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली पाहिजे. तरच देशातील आर्थिक परिस्थिती व्यवस्थित राहील. अन्यथा देशात आर्थिक अराजक आल्यास त्याची सगळी जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

अमेरिकेने ७५ हजार डॉलरपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला १,२०० डॉलर्स रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली आहे. इंग्लंडमध्येही प्रत्येक व्यक्तीला सरासरी २५०० पाऊंड देण्याची तरतूद केली आहे. जर्मनीने त्यांच्या कामगारांना ६० टक्के पगार सरकारकडून देण्याची योजना सुरू केली आहे. कॅनडाने देखील तिथल्या बेरोजगार आणि रोजगार गमावलेल्या तरुणांच्या खात्यात थेट आर्थिक मदत दिली आहे. भारतात केंद्र सरकारने अशी थेट मदत दिली पाहिजे. मदत न देता लोकांनाच कर्ज घ्या म्हणून सांगणे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, चव्हाण म्हणाले.

आॅडिओ क्लिपवर बोलण्यास नकार

‘राज्यात शिवसेनेचं सरकार आहे, काँग्रेसचं नाही,’ या पृथ्वीराज चव्हाण यांच्या कथित वक्तव्याची एक आॅडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. मात्र, ही क्लिप कधीची आहे, हे माहिती नाही, असे सांगत त्यांनी यावर बोलणे टाळले.

टॅग्स :पृथ्वीराज चव्हाणमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस