"केंद्र सरकारने साजरा करावा 'सिनेमा डे", ९९ रुपयांमध्ये रसिकांनी पाहिला सिनेमा

By संजय घावरे | Published: October 13, 2023 06:48 PM2023-10-13T18:48:32+5:302023-10-13T18:49:34+5:30

आज संपूर्ण भारतात 'सिनेमा डे' म्हणून साजरा करण्यात येत असून केवळ ९९ रुपयांमध्ये सिनेमा पाहण्याचा आनंद रसिक लुटत आहेत.

Central Government should celebrate Cinema Day, movie lovers watched for Rs.99 | "केंद्र सरकारने साजरा करावा 'सिनेमा डे", ९९ रुपयांमध्ये रसिकांनी पाहिला सिनेमा

"केंद्र सरकारने साजरा करावा 'सिनेमा डे", ९९ रुपयांमध्ये रसिकांनी पाहिला सिनेमा

मुंबई- आज संपूर्ण भारतात 'सिनेमा डे' म्हणून साजरा करण्यात येत असून केवळ ९९ रुपयांमध्ये सिनेमा पाहण्याचा आनंद रसिक लुटत आहेत. पितृपक्षामुळे या आठवड्यात एकही मोठा सिनेमा रिलीज झाला नाही, पण त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमांना याचा फायदा होत आहे. 

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने यंदा १३ ऑक्टोबर हा 'नॅशनल सिनेमा डे' म्हणून साजरा करण्यात येत आहे. मागच्या वर्षी सुरू साजरा करण्यात आलेला हा दिवस अगोदर १६ सप्टेंबर आणि नंतर २३ सप्टेंबरला ठरवण्यात आला होता, पण यंदा आज साजरा होत आहे. मागच्या वर्षी सिनेमा डेला ६.५ मिलियन रसिकांनी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहिला. यंदाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे थिएटर ओनर्स अँड एक्झीबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. दातार म्हणाले की, हा सिनेमा डे सरकारने घोषित केलेला नाही. मल्टिप्लेक्स आणि काही नॅशनल कंपन्या मिळून हा दिवस साजरा करत आहेत. या अंतर्गत ९९ रुपयांमध्ये रसिकांना सिनेमा पाहायला मिळाला. सध्याचा काळ सिनेमागृहांसाठी कठीण आहे. पितृपक्ष आणि नवरात्रोत्सवाची तयारी सुरू असल्याने सिनेमांना बुकिंग खूप कमी आहे. कोणताही नवीन सिनेमा रिलीज होत नसल्याने एक नवीन उपक्रम राबवून बुकिंग वाढवण्याचा चांगला प्रयत्न करण्यात येत आहे. मागच्या वर्षी बरा प्रतिसाद होता. यंदाही चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.

तो दिवस 'सिनेमा डे' असावा...
भारतामध्ये मनोरंजन विश्वाची उलाढाल खूप मोठी असल्याने केंद्र सरकारने 'सिनेमा डे' साजरा करायला हवा असे थिएटरवाल्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने सिनेमा डे साजरा केला तर एक वेगळे वातावरण तयार होईल. भारतातील पहिले थिएटर कोलकात्यामध्ये सुरू झाले होते. ज्या दिवशी परवान्यासह हे थिएटर सुरू झाले तो दिवस 'सिनेमा डे' म्हणून साजरा करण्यात यावा अशी थिएटरवाल्यांची मागणी आहे. 

पहिले थिएटर 'चॅप्लिन सिनेमा'
'एलफिन्स्टन पिक्चर पॅलेस' हे भारतातील पहिले थिएटर कोलकाता येथे १९०७मध्ये सुरू करण्यात आले होते. हे थिएटर 'चॅप्लिन सिनेमा'  या नावानेही ओळखले जाते, जे ७ एप्रिल १९१२ या दिवशी जनतेसाठी खुले करण्यात आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने हा दिवस जर 'सिनेमा डे' म्हणून साजरा केला तर त्या दिवसालाही महत्त्व येईल.

Web Title: Central Government should celebrate Cinema Day, movie lovers watched for Rs.99

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.