अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्ष सोहळ्याचा उत्साहात शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 19:57 IST2025-09-26T19:56:45+5:302025-09-26T19:57:09+5:30
या उद्घाटन सोहळ्याने संस्थेच्या गौरवशाली वाटचालीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्ष सोहळ्याचा उत्साहात शुभारंभ
मुंबई-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी गेल्या शंभर वर्षांपासून कार्यरत असलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (एआयआयएलएस जी) च्या शताब्दी वर्षाचा शुभारंभ वांद्रे (पूर्व) येथील मुख्यालयात उत्साहात संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्याने संस्थेच्या गौरवशाली वाटचालीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.
अंधेरी पश्चिम जुहू गल्ली येथे १९२६ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रशिक्षण, धोरण संशोधन, सल्लागार सेवा आणि प्रशासनिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून भक्कम पाठबळ दिले आहे. शंभर वर्षांची ही वाटचाल केवळ कालगणनेचा प्रवास नसून, भारतीय लोकशाहीच्या पाया बळकट करणाऱ्या असंख्य प्रयत्नांची साक्ष आहे.
शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटन संस्थेचे महासंचालक डॉ. जयराज फाटक (भा. प्र. से. - निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. (प्रो.) स्नेहा पळणीटकर, वरिष्ठ कार्यकारी संचालक उत्कर्षा कवडी, मुख्य वित्तीय अधिकारी देवर्षी पंड्या, संचालक डॉ. अजित साळवी, तसेच कार्यकारी संचालक शेखर नाईक व अमित बिसवास आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य कार्यालयात पारंपरिक रांगोळ्यांनी सजवलेल्या वातावरणात उत्सवाचे वेगळेपण जाणवत होते. डॉ. फाटक यांनी संस्थेचा गौरवशाली इतिहास उलगडत, स्थानिक स्वराज्य व्यवस्थेच्या विकासात संस्थेच्या भूमिकेचे कौतुक केले. संस्थेचे शताब्दी वर्ष केवळ एक उत्सव नाही, तर लोकशाहीच्या गढलेल्या मुळांना आणखी बळकट करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.तर डॉ. साळवी यांनी संस्थेच्या १०० वर्षांच्या प्रवासाचा संक्षिप्त आढावा सादर केला.
संस्थेचे अध्यक्ष रणजीत चव्हाण यांचे संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान असून, हा शताब्दी महोत्सव म्हणजे स्थानिक स्वराज्य व्यवस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
संस्थेच्या शताब्दी वर्षात देशभरात विविध उपक्रम राबवण्यात येणार असून, प्रशिक्षण कार्यशाळा, परिसंवाद, संशोधन प्रकल्प आणि पुरस्कार समारंभाच्या माध्यमातून स्थानिक प्रशासन अधिक सक्षम करण्याचा संस्थेचा संकल्प आहे.