दिंडोशीतील सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर, १५ रस्त्यांपैकी ५ रस्त्यांचे काम पूर्ण
By मनोहर कुंभेजकर | Updated: May 19, 2025 19:23 IST2025-05-19T19:21:04+5:302025-05-19T19:23:16+5:30
दिंडोशीतील रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून येथील १५ रस्त्यांपैकी ५ रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणं पूर्ण झाले.

दिंडोशीतील सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर, १५ रस्त्यांपैकी ५ रस्त्यांचे काम पूर्ण
मनोहर कुंभेजकर, मुंबई: दिंडोशीतील रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून येथील १५ रस्त्यांपैकी ५ रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणं पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्यांची कामे येत्या दि,३१ मे पर्यंत पूर्ण होतील असा विश्वास उद्धव सेनेचे नेते,आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केला.एकीकडे मुंबईतील ४५ टक्यांचे काँक्रीटीकरण झाले अशी तक्रार सत्ताधारी करत असतांना आपला पाठपुरावा आणि पालिका प्रशासनाचे सहकार्य यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.तर पालिका प्रशासनाने देखिल याला दुजोरा दिला असून येत्या दि,३१ मे पर्यंत उर्वरित रस्त्यांची कामे पूर्ण होतील असे त्यांनी सांगितले.
येथील खातुशाम मंदिर रस्ता, साई मंदिर ते आंबेडकर चौक रस्ता, संकल्प सोसायटी रस्ता, बसुवाला कॉलनी रोड. संतोषी माता रोड या पाच सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण झाली असून येथे वाहने आता खड्डेमुक्त रस्त्यातून सुसाट जात असल्याचे चित्र आहे.
येथील रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करा यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बैठक घेतली.त्यांच्या सूचने नुसार पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे बैठक झाली.अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर तसेच परिमंडळ ४ चे तात्कालीन सहआयुक्त विश्वास शंकरवार, आणि विद्यमान उपायुक्त डॉ.भाग्यश्री कापसे, पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांच्या कडे पाठपुरावा केला. यामुळेच हे शक्य झाल्याचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले.
येथील रस्त्यांची कामे वेळेत होण्यासाठी उद्धव सेनेचे उपविभागप्रमुख,शाखाप्रमुखांनी आणि आपण स्वतः रात्री येथील कामावर जातीने देखरेख ठेवली.येथील रस्त्यांच्या कंत्राटदारांकडून खंडणी मागणाऱ्या गाव गुंडाचा देखिल पोलिसांकडून बंदोबस्त केला अशी माहिती आमदार प्रभू यांनी दिली.