Join us  

होळी, धुलीवंदन अन् रंगपंचमी साधेपणाने साजरी करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 11:44 AM

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार येत्या १५ एप्रिलपर्यंत पुन्हा काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देगेल्या वर्षभरात मोठ्या उत्साहात एकही सण देशवासियांना साजरा करण्यात आला नाही.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शनिवारी राज्यभरातील कोविडसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी १५ एप्रिल २०२१ पर्यंत काही निर्बंध लावण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागत नागरिकांना अगदी आवश्यक आणि तत्काळ कामांसाठीच प्रवेशाची परवानगी देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर, आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा देत सण साधारपणे साजरा करण्याचं आवाहन केलंय. 

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार येत्या १५ एप्रिलपर्यंत पुन्हा काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. रविवारी रात्री ८ वाजेपासून जमावबंदी लागू करताना ती मोडल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. गर्दीच्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल. विनामास्क फिरल्यास पाचशे रुपये दंड पडेल. रात्री ८ पासून ते सकाळी ७ पर्यंत या जमावबंदी लागू असल्याच्या काळात उद्याने, समुद्रकिनारे, मॉल्‍स, सर्व सिनेमागृहे, रेस्‍टॉरंट  बंद राहणार आहेत. 

कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून देशातील जनात त्रस्त असून सण-उत्सवांवरही कोरोनाचे संकट पाहायला मिळाले. गेल्या वर्षभरात मोठ्या उत्साहात एकही सण देशवासियांना साजरा करण्यात आला नाही. निदान, कोरोनाची लस आल्यानंतर तरी कोरोनापासून सुटका होईल, अशी आशा नागरिकाना होती. मात्र, अद्यापही कोरोनाचे संकट गडदपणे दिसून येत आहे. त्यामुळेच, आगामी होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी हे सणही साधेपणानेच साजरे करावे लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला तसे आवाहनही करण्यात आलंय.  परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. तसेच होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

धार्मिक स्‍थळांवर प्रवेश मर्यादित

धार्मिक स्‍थळांवर जागेची उपलब्‍धता आणि शारीरिक अंतर लक्षात घेउन प्रत्‍येक तासाचे प्रवेश संबंधित व्यवस्‍थापनांनी निश्चित करावे. धार्मिक स्थळ आणि त्यांच्या ट्रस्टींनी कमीत कमी भाविकांना मंदिरात दर्शन कसे देता येईल यावर लक्ष केंद्रीत करावे.ऑनलाईन दर्शनाची सुविधा देण्यात यावी. मंदिरात येणाऱ्यांनी कोरोना नियमांची त्रिसूत्री पाळली की नाही, ते पाहूनच मंदिरात प्रवेश द्यावा, असे आदेशात म्हटले आहे.

जमावबंदी काळातील कडक उपाययोजना

रात्री ८ पासून ते सकाळी ७ पर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद. जमावबंदीचे उल्लंघन केल्यास प्रति व्यक्ती एक हजार रुपये दंड.मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये दंड. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही. नाट्यगृहे आणि सभागृहे अशा कार्यक्रमांसाठी वापरल्यास कारवाई.  नाट्यगृह, सभागृहे कोरोनाकाळ संपेपर्यंत बंद. सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाहोळीरांगोळीकोरोना वायरस बातम्या