Join us  

'लालबागचा राजा' मंडळाने परंपरेत खंड पडू देऊ नये; गणेशोत्सव समन्वय समितीने सुचवला मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 5:12 PM

लालबाग राजा सार्वजनिक मंडळाच्या निर्णयाचे स्वागत आहे.

मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 'लालबागचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता 'देश हाच देव' मानून यंदा आरोग्य उत्सव साजरा करणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. मात्र लालबागचा राजा मंडळाने भाद्रपद उत्सवाची परंपरा अखंडित ठेवावी व यंदा भाविकांसाठी केवळ लाइव्ह दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

नरेश दहिबावकर म्हणाले की, लालबाग राजा सार्वजनिक मंडळाच्या निर्णयाचे स्वागत आहे. मंडळाने जाहीर केलेल्या आरोग्य उत्सव उपक्रम कौतुकास्पद आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार ४ फुटांपर्यंत गणेशमूर्तीची उंची ठेवून ' लालबागचा राजा ' मंडळाने भाद्रपद उत्सवाची परंपरा अखंडित ठेवावी. त्याचप्रमाणे भाविकांसाठी लाइव्ह दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, अशी समन्वय समितीची इच्छा आहे. अन्य उर्वरित मंडळाने निर्णय घेतला नसेल, तर त्यांनी हे विचारात घ्यावे, असं नरेंद्र दहिबावकर यांनी पत्राद्वारे सांगितले आहे. 

हजारो मंडळांनी भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून यंदा साधेपणाने का हाईना परंपरा खंडीत न करता गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या निर्णयाला विरोध नाही. मात्र परंपरा अखंडित ठेवता येईल, यासाठी काहीतरी सुवर्णमध्ये काढावा, अशी विनंती देखील करण्यात आली आहे. त्यामुळे समन्यव समितीने सुचवलेल्या मार्गानंतर लालबागचा राजाचं मंडळ निर्णयात बदल करतं का, याकडे आता सर्वाचं लक्षं लागलं आहे.

तत्पूर्वी, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता गणेशोत्सव साजरा न करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंडळानं घेतला आहे. त्याऐवजी मंडळाकडून आरोग्यसेवेच्या दृष्टीनं महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये रक्तदान आणि प्लाज्मादानचा समावेश आहे. यासाठी मंडळाकडून कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे.

असा होणार लालबागच्या राजाचा उत्सव-

  • गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार नाही. मात्र, भविष्यात तीच मूर्ती कायम राहणार
  • ११ दिवस फक्त रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपीसारखे उपक्रम राबवणार..
  • कोरोनालढ्यात शहिद झालेल्या पोलिस पोलिसांच्या कुटुंबातील २० वीरमातांचा सन्मान
  • मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपये देणार
  • गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान

लालबागचा राजा मंडळाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

टॅग्स :लालबागचा राजामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईउद्धव ठाकरेगणेशोत्सव