Join us  

परमबीर सिंग ‘लेटर बॉम्ब’प्रकरणी तपासाला वेग; सीबीआय पथक एनआयए कार्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 2:31 AM

सीबीआयने एनआयएने जप्त केलेली सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी तपासासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यामध्ये वाझे खंडणी गोळा करत असलेल्या मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्सचा तपशील आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) एक पथक शुक्रवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कार्यालयात दाखल झाले होते. निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेच्या जप्त केलेल्या डायरीसह अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांबाबत चौकशी करण्यात आली.माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांनी पोलीस दलाला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा दावा केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे.सीबीआयने परमबीर सिंग यांच्यासह याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि वाझेचे जबाब नोंदवले आहेत. तर, मुंबई पोलीस दलातील उपायुक्त डॉ. राजू भुजबळ यांना चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.दरम्यान, सीबीआयने एनआयएने जप्त केलेली सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी तपासासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यामध्ये वाझे खंडणी गोळा करत असलेल्या मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्सचा तपशील आहे. शुक्रवारी एनआयए कोर्टाने डायरी उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य केली. ही डायरी सीबीआयसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानुसार सीबीआयने शुक्रवारी एनआयए कार्यालयात दाखल होत, तपासासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत चौकशी केली. तसेच या वेळी वाझेकडेही चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.सुमारे साडेतीन तास सीबीआय पथक कार्यालयात होते. तसेच मुंबईतील बार, रेस्टॉरंट यांची माहिती घेऊन, यापैकी काही व्यावसायिकांकडेही सीबीआय चौकशी करणार असल्याचे समजते.

टॅग्स :परम बीर सिंगगुन्हा अन्वेषण विभागराष्ट्रीय तपास यंत्रणा