मुंबई - सीमाशुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याला त्याच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून वाचवण्यासाठी त्याच्याकडून २० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सीबीआयने सीबीआयच्याच उपअधीक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ए. भास्कर असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तो सीबीआयच्या मुंबईतील कार्यालयात कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या मुंबईतील बँकिंग फ्रॉड विभागात कार्यरत असलेल्या एका उपअधीक्षकाच्या विरोधातही लाचखोरीचा गुन्हा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दाखल केला होता. बी.एम. मीना असे या अधिकाऱ्याचे नाव होते. महिनाभरात सीबीआयने स्वतःच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मार्च, २०२३ मध्ये सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण ए. भास्कर याच्याकडे तपासासाठी देण्यात आले होते. सीमाशुल्क न भरता आयात केलेले सामान सोडण्यासाठी पैसे घेत असल्याचा आरोप रोशन कुमार या सीमाशुल्क विभागात सहाय्यक आयुक्तपदी काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर होता. त्याला या प्रकरणात वाचवण्यासाठी ए. भास्कर याने त्याच्याकडून २० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्याच्यावर सीबीआयने ठेवला आहे. सीबीआयचे उपायुक्त राजेश पांडे यांनी ए. भास्कर याच्याविरोधात तक्रार दाखल करत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.