शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
By गौरी टेंबकर | Updated: June 12, 2025 08:55 IST2025-06-12T08:53:12+5:302025-06-12T08:55:07+5:30
Crime News: सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये फ्लॅट क्रमांक ९०१ मध्ये राहणाऱ्या कासम सय्यद याने त्याच्या घराबाहेरील शू रॅकवर उभ्या असलेल्या कालूला उचलून खिडकीतून खाली फेकल्याचे समोर आले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज मोबाइलमध्ये घेऊन समशी यांनी पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.

शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: शू रॅकवर बसलेल्या एका पाळीव मांजरीला एक रहिवाशाने नवव्या मजल्यावरून खाली फेकल्याची घटना मालाड पश्चिमेकडे घडली. यामध्ये मांजरीचा तडफडून मृत्यू झाला. सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये ही हृदयद्रावक घटना कैद झाल्यानंतर मांजरीच्या मालकाने मालवणी पोलिस ठाण्यात शेजाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कापड व्यावसायिक असलेल्या तक्रारदार गुरनाज समशी (४५) या मालाड पश्चिमेकडील ग्रो मोर वनेक्स इमारतीच्या २१व्या मजल्यावर या कुटुंबासोबत राहत होत्या. एप्रिल २०२४ पासून त्यांनी कालू नावाची काळ्या पांढऱ्या रंगाची मांजर पाळली होती. ५ जून रोजी कालू मांजर घराबाहेर फिरायला गेली होती. त्यानंतर, इमारतीखाली खेळणाऱ्या मुलांना ती खाली पडल्याचे लक्षात आले. या घटनेने समशी कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये फ्लॅट क्रमांक ९०१ मध्ये राहणाऱ्या कासम सय्यद याने त्याच्या घराबाहेरील शू रॅकवर उभ्या असलेल्या कालूला उचलून खिडकीतून खाली फेकल्याचे समोर आले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज मोबाइलमध्ये घेऊन समशी यांनी पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.