Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' विद्यार्थ्यांना वर्षाकाठी ६० हजारांपर्यंत रोख; धनगर विद्यार्थ्यांसाठी स्वयम् योजना लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 05:57 IST

वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या धनगर विद्यार्थ्यांसाठी स्वयम् योजना लागू

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भाड्याने खोली घेऊन राहण्यासाठी व जेवणासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना ओबीसी कल्याण विभागाने सुरू केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना वर्षाकाठी ६० हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता वर्षाकाठी ३२ हजार रु., निवासी भत्ता २० हजार रु. आणि निर्वाह भत्ता ८ हजार रु. असे ६० हजार रुपये दिले जातील. 

इतर महसुली विभागीय शहरांतील उर्वरित क वर्ग महापालिका क्षेत्रांमध्ये भोजनभत्ता २८ हजार रु., निवास भत्ता १५ हजार रु. आणि निर्वाह भत्ता ८ हजार रु. असे ५१ हजार रुपये देण्यात येतील. इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी ही रक्कम अनुक्रमे २५ हजार रु., १२ हजार रु. आणि ६ हजार रु. म्हणजे एकूण ४३ हजार रु. असेल. तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम अनुक्रमे २३ हजार रु., १० हजार रु. आणि ५ हजार रु. अशी ३८ हजार रु. असेल. 

प्रत्येक जिल्ह्यातील ६०० विद्यार्थ्यांना म्हणजे राज्यातील २१ हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. त्यात व्यावसायिक शिक्षण घेणारे ७० टक्के विद्यार्थी, तर बिगरव्यावसायिक शिक्षण घेणारे ३० टक्के विद्यार्थी असतील. ६० टक्के गुणांसह १२ वीनंतरचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही योजना लागू असेल. रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.

सध्या कोणाला लागू?अनुसूचित जाती, जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयम् योजना आधीपासूनच लागू करण्यात आली आहे. धनगर समाजातील उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयम् योजना लागू करून महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. या समाजातील विद्यार्थ्यांना हे एक मोठे प्रोत्साहनच असेल. - अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री

टॅग्स :मुंबईविद्यार्थी