BMC:मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात चोरीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने २० हजार रुपयांची रोकड लांबवली आहे. या घटनेमुळे पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी स्थायी समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर वॉर्ड क्रमांक ५६ च्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया आपली पर्स सभागृहातच ठेवून इतर सहकाऱ्यांसोबत जेवणासाठी बाहेर गेल्या होत्या. काही वेळाने त्या परतल्या असता, त्यांना आपली पर्स उघडलेली दिसली. संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता, पर्समधील २० हजार रुपयांचे बंडल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महत्त्वाचे म्हणजे पर्समधील चार्जर आणि इतर वस्तू अस्ताव्यस्त करण्यात आल्या होत्या.
सीसीटीव्ही नाही; तपासात मोठा अडथळा
या चोरीच्या प्रकारानंतर भाटिया यांनी तातडीने सुरक्षा विभाग आणि एमएस विभागाकडे धाव घेतली. मात्र, ज्या सभागृहात मुंबईच्या हजारो कोटींच्या बजेटवर चर्चा होते, त्याच स्थायी समिती सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅमेरे नसल्यामुळे ही चोरी नेमकी कोणी केली, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
नगरसेवकच सुरक्षित नाहीत, तर सामान्य जनता काय?
या संतापजनक प्रकारावर प्रतिक्रिया देताना लक्ष्मी भाटिया म्हणाल्या, "स्थायी समिती म्हणजे महापालिकेची तिजोरी मानली जाते. जर या ठिकाणीच लोकप्रतिनिधींच्या वस्तू सुरक्षित नसतील, तर सामान्यांचे काय? अवघ्या १० मिनिटांच्या अंतरात ही चोरी झाली आहे. महिला नगरसेविकेची पर्स उघडून पैसे चोरीला जाणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे."
या घटनेवरून मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी पालिका प्रशासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "जिथे शहराचे अर्थकारण ठरते, तिथेच अशा घटना घडणे ही प्रशासनासाठी नामुष्कीची गोष्ट आहे. सभागृहातील सुरक्षेची ही अवस्था असेल, तर मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी लक्ष्मी भाटिया यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांकडे लेखी तक्रार केली आहे. आझाद मैदान पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पोलीस आता सभागृहाबाहेरील कॉरिडॉरमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घेत आहेत. या निमित्ताने पालिका भवनातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Web Summary : Rs. 20,000 stolen from corporator Laxmi Bhatia's purse in BMC hall. Lack of CCTV raises security concerns. Political uproar ensues, questioning overall safety.
Web Summary : बीएमसी हॉल में पार्षद लक्ष्मी भाटिया के पर्स से 20,000 रुपये की चोरी। सीसीटीवी की कमी से सुरक्षा पर सवाल। राजनीतिक हलचल, सुरक्षा पर प्रश्नचिह्न।