मच्छिंद्र चाटे यांची केली सत्र न्यायालयाने सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 05:01 IST2019-01-22T05:00:07+5:302019-01-22T05:01:11+5:30
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयी पत्रकार परिषदेत अपशब्द वापरल्याचा आरोप असलेले चाटे क्लासेसचे संस्थापक मच्छिंद्र चाटे यांची सोमवारी सत्र न्यायालयाने सुटका केली.

मच्छिंद्र चाटे यांची केली सत्र न्यायालयाने सुटका
मुंबई: दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयी पत्रकार परिषदेत अपशब्द वापरल्याचा आरोप असलेले चाटे क्लासेसचे संस्थापक मच्छिंद्र चाटे यांची सोमवारी सत्र न्यायालयाने सुटका केली. त्यांच्याविरुद्ध पुरावे नसल्याचे म्हणत सत्र न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाने चाटे यांना दोन महिन्यांची ठोठावलेली कारागृहाची शिक्षा रद्द केली.
१ नोव्हेंबर २००० रोजी मच्छिंद्र चाटे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन देशमुख यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. या वेळी ‘एच’ ब्रँचचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी हे वृत्त एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. लोकांमध्ये संताप पसरल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी चाटे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा नोंदविला.
तीन साक्षीदारांच्या साक्षीवरून दंडाधिकारी न्यायालयाने ३० मार्च २०१७ रोजी चाटे यांना दोन महिन्यांची कारावासाची आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या निर्णयाला चाटे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले.
दंडाधिकारी न्यायालयाने वृत्त प्रसिद्ध करणाºयाची साक्ष नोंदविली नाही. तक्रारदार स्वत: घटनवेळी हजर नव्हता. तसेच एखाद्याविरुद्ध अपशब्द वापरल्यास ती केस बदनामीची होऊ शकते. त्यासाठी ज्याच्याविषयी अपशब्द वापरले, त्याने स्वत: तक्रार करणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद चाटे यांच्या वकिलांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने पुरावे नसल्याचे म्हणत चाटे यांची कारागृहाची शिक्षा रद्द केली.