Join us  

राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 6:05 AM

या दुर्घटनेतील जखमींवर सरकार उपचार करणार असून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर इथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग तातडीने काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अशा प्रकारचे होर्डिंग किंवा कुठलेही बांधकाम पडू शकते, त्यामुळे त्याबाबत राज्यभर उपाययोजना करण्याच्या सूचना आपत्तकालीन विभागाचे प्रमुख आणि मुख्य सचिवांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमत्र्यांनी सोमवारी रात्री घाटकोपर येथील दुर्घटनास्थळाला भेट दिली, तसेच राजावाडी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी जबाबदार असणाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शिंदे यांनी घटनास्थळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या दुर्घटनेतील जखमींवर सरकार उपचार करणार असून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी फोनवर चर्चा करून मुंबईत वादळी वाऱ्यामुळे घडलेल्या घटनांबाबत माहिती घेतली. मुंबईत आणि ठाण्यात घडलेल्या अशा घटनांमध्ये मदतकार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेपाऊसमुंबईघाटकोपर