कर्नाक पुलाला आता 'सिंदूर पूल' असे नाव! लोकार्पणाचा मुहूर्त ठरला, उद्या फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:52 IST2025-07-09T11:50:44+5:302025-07-09T11:52:18+5:30
Carnac Bridge Renamed Sindoor: पुलाने नामकरण 'सिंदूर पूल' असे होणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

कर्नाक पुलाला आता 'सिंदूर पूल' असे नाव! लोकार्पणाचा मुहूर्त ठरला, उद्या फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर मिळाला असून १० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या पुलाने नामकरण 'सिंदूर पूल' असे होणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
इंग्रज गव्हर्नर कर्नाक यांच्या नावाने हा पूल ओळखला जात होता. या पुलाचे काम १० जून रोजी पूर्ण झाले आहे. मात्र, पुलाच्या नामकरणावरुन लोकार्पण रखडले होते. अखेर पुलाचे नामकरण 'सिंदूर' असे करण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतील पूर्व-पश्चिम भागांना जोडणाऱ्या या पुलावरुन दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी पूल महत्त्वाचा आहे. १५० वर्षे जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्यानंतर मध्य रेल्वेने ऑगस्ट २०२२ मध्ये हा पूल पाडला. त्यानंतर मशीद बंदर परिसरात विद्यामान मार्ग कायम ठेवण्यासाठी महापालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली. मध्य रेल्वे प्रशासानाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.
पूल सुरू न झाल्याने स्थानिकांमध्ये होती नाराजी
दक्षिण मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल पूर्ण होऊनही बंद ठेवण्यात आल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त करत येथे आंदोलनही केले होते. त्याला काही राजकीय पक्षांचाही पाठिंबा मिळाला होता.
नवीन पुलामुळे होणारे फायदे
- दक्षिण मुंबईतील पी.डिमेला मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव या भागांना लोहमार्गावरुन पूर्व-पश्चिमेला जोणारा महत्त्वाचा दुवा.
- सुमारे १० वर्षांपासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होणार
- पूल कार्यान्वित झाल्यावर पी. डिमेलो मार्ग विशेषत: वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्ग यांच्या छेदनबिंदूवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत.
- युसूफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काही सय्यद मार्गावरील वाहतूक होणार सुलभ