Join us

'निष्काळजी हेच आगीचे मुख्य कारण'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 12:10 IST

मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये उंच इमारती, पंचतारांकित हॉटेल, झोपडपट्ट्या, फर्निचर मार्केटमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत.

मुलाखत, रवींद्र अंबुलगेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये उंच इमारती, पंचतारांकित हॉटेल, झोपडपट्ट्या, फर्निचर मार्केटमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत. आगीसारख्या आपत्कालीन घटनांवेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अशा वेळी घाबरून न जाता काय उपाययोजना कराव्यात, मदत कार्य कसे करावे, या संदर्भात 'लोकमत'ने मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी निष्काळजी हेच आगीचे मुख्य कारण असल्याचे सांगितले.

आगी लागण्याचे मुख्य कारण काय?

बहुसंख्य घटनांमध्ये शॉर्टसर्किट हे महत्त्वाचे कारण असल्याचे दिसून येते. तकलादू वायरिंग हे आणखी एक प्रमुख कारण आहे. हलक्या दर्जाची वायरिंग असेल आणि विजेचा अधिक भार आल्यास ओव्हरहिटिंगमुळे तारा आतून वितळतात आणि मग शॉर्टसर्किट होते. घरातील एसी, ओव्हन, हिटर, गिझर, आदी उपकरणे अधिक वीज खेचतात. त्यादृष्टीने वायरिंग आणि पूरक सुविधा आवश्यक असते. पण, अनेकदा त्याकडेदुर्लक्ष होते.

उंच इमारतींमध्ये आगी लागण्याचे काय कारण असावे?

अनेकदा इमारतींमधील घरांत इलेक्ट्रिक उपकरणे काम झाल्यावर बंद करण्यात निष्काळजी दिसून येते. इलेक्ट्रिक इस्त्री, गिझर, ओव्हन चालूच ठेवला जातो. त्यामुळे मग दुर्घटना घडते.

अलीकडे कुर्ला, भायखळा तसेच फर्निचर मार्केटमध्ये आगीच्या घटनाही वाढल्या आहेत. 

फर्निचर मार्केट किंवा व्यावसायिक गाळ्यांच्या ठिकाणी वेल्डिंगची कामे चालतात. एलपीजी सिलिंडर असतात. अशा ठिकाणी काही गफलत झाल्यास किंवा शॉर्टसर्किट झाल्यास आग लागते. अशा ठिकाणी ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्याने व्याप्ती वाढते.

लोकांमध्ये कशा प्रकारची निष्काळजी दिसून येते?

अनेक सोसायट्यांमध्ये फायर लिफ्टचा अभाव असतो. लिफ्ट असली तरी देखभाल व्यवस्थित नसल्याने वरच्या मजल्यावर चालत जाऊन आग विझवावी लागते. नव्याने उभ्या राहत असलेल्या इमारतींच्या प्रत्येक मजल्यावर अग्निशमन यंत्रणा असते. परंतु, ती कशी वापरावी याचे प्रशिक्षण सोसायटीच्या सदस्यांना नसते. काही ठिकाणची यंत्रणा कालबाह्य झालेली असते.

सोसायटी, उद्योगांच्या ठिकाणी अग्निसुरक्षेचे निकष काय आहेत?

यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित आहे की नाही, याची वर्षातून दोनवेळा तपासणी करून 'फॉर्म-बी' हे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. वर्षातून एकदा ऑडिट करणे बंधनकारक असते. आम्ही अनेकदा अचानक भेटी देऊन तपासणी करतो. नियमांची पूर्तता नसल्यास नोटीस बजावून पुढील कारवाई केली जाते.

एखाद्या घरात आग लागल्यास तत्काळ काय करावे?

आग लागल्यास लोक भांबावून जातात. अशा वेळी घरातील मेन स्विच बंद करावा. त्यासाठी मेन स्विच कुठे आहे, याची घरातल्या प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. स्विच बंद केल्यानंतर मग आगीवर पाणी मारायचे. त्यामुळे आगीची व्याप्ती कमी होते. घरातील किंवा व्हरांड्यातील अग्निशामक यंत्र कशी वापरायची याची माहिती असावी.

कितव्या मजल्यापर्यंतच्या आगी विझविण्याची अग्निशमन दलाची क्षमता आहे?

आपण अगदी शंभराव्या मजल्यावरील आगही विझवू शकतो. परंतु, त्यासाठी फायर लिफ्ट आवश्यक असते. ती नसेल तर जिन्याने तिथे जाऊन आग विझवावी लागते. आपल्या ताफ्यात २२ व्या मजल्यापर्यंत पोहोचेल एवढी ९० मीटर उंची आहे. जगातील काही देशांत ११२ मीटर उंचीच्या शिड्या आहेत. ९० मीटरपेक्षा जास्त उंचीवर आग लागल्यास त्या मजल्याच्या आतील अग्निशमन यंत्रणा वापरून आग विझवावी लागते. त्याचवेळी ९० मीटर उंचीवर असलेल्या शिडीवरून बाहेरून पाण्याचे फवारे मारले जातात.

 

टॅग्स :आगअग्निशमन दल