Join us

नाटक, चित्रपटातील करिअर संधी; कला शाखेला पसंती, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 02:28 IST

इतर शाखांपेक्षा फीसुद्धा कमी

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, वेबसिरीजच्या वाढत्या प्रभावामुळे मुलांचा ओढा त्या क्षेत्राशी संबंधित अभिनय, लेखन आणि इतर तांत्रिक गोष्टींकडे वाढलेला आहे. त्यात नृत्य, संगीत, पत्रकारिता या क्षेत्रातील संधी आणि स्पर्धा परीक्षांसाठीच्या तयारीचीही भर पडली आहे. म्हणूनच या संधींना प्रोत्साहन देणाऱ्या कला शाखेलाही विद्यार्थी आणि पालकांची वाढती पसंती मिळत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाही कला शाखेचा कटऑफ काहीसा चढाच राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

मागील वर्षी मुंबई विभागात कला शाखेसाठी ४९१ कनिष्ठ महाविद्यालयांतून एकूण ५३,६७० इतक्या प्रवेशाच्या जागा होत्या. मात्र, त्यातील अवघ्या २६,२०५ म्हणजे ४८.८२ टक्के जागाच भरल्या गेल्या. प्रवेश क्षमता आणि प्रत्यक्ष प्रवेश यातील अंतर जरी अधिक असले तरी मागील वर्षी कला शाखेसाठी सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा कटऑफ ९२.८ टक्के होता, हे विसरून चालणार नाही. जय हिंद महाविद्यालयात ८९.२  टक्क्यांवर अकरावी प्रवेश बंद झाले होते.

वाणिज्य शाखेनंतर...

विद्यार्थ्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे जाण्यालाही पसंती असल्याने सुरुवातीला कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नंतर त्या अभ्यासक्रमांकडे गळती होण्याचे प्रकारही आढळतात. सीईटी परीक्षा नसलेल्या डिप्लोमा किंवा बीएमएसकडेही विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो. मात्र, वाणिज्य शाखेनंतर कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल असतो, असे माजी मुख्याध्यापक तथा समुपदेशक सुदाम कुंभार यांनी सांगितले. 

कला शाखेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. नाटककार, कवी, लेखक, साहित्यिक, कलाकार, अभिनेते याच शाखेमधून सर्वाधिक घडतात. या शाखेची फी तुलनेत कमी असते. प्रॅक्टिकल वगैरेचा खर्चही नसतो. पदवी मिळविण्याच्या दृष्टीनेही कला शाखेला पसंती मिळते. - जयवंत कुलकर्णी, ज्येष्ठ समुपदेशक.

कला शाखेतील मागील वर्षीचा कटऑफ

सेंट झेवियर्स कॉलेज    ९२.८% जय हिंद कॉलेज    ८९.२% रिझवी कॉलेज    ७५%रुईया कॉलेज    ७१% साठे कॉलेज    ६४%आर. डी. नॅशनल कॉलेज    ६२%

 

टॅग्स :प्रवेश प्रक्रियाशिक्षण