मुंबईच्या तरुणांसाठी करिअर दिशा; भाजयुमो मुंबईचा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 20:18 IST2021-11-15T20:18:08+5:302021-11-15T20:18:23+5:30
मुलाखतीची तयारी, प्रभावी बायोडेटा कसा तयार करायचा, रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयांवर प्रशिक्षण दिले जाईल

मुंबईच्या तरुणांसाठी करिअर दिशा; भाजयुमो मुंबईचा अनोखा उपक्रम
मुंबई -भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईने राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून मुंबईच्या तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी "करिअर दिशा" अभियान सुरू केले आहे. या मोहिमेचा शुभारंभ मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपा नेते व माजी मंत्री अँड.आशिष शेलार, मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत केला. या अभियानांतर्गत इयत्ता दहावी ते ३० वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिकांना शिक्षण आणि नोकरी क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, दिशा योग्य असेल तर परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. आणि तरुणांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करू शकतात. मुंबईतील सर्व ३६ विधानसभांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या अंतर्गत १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि एनडीए सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी अनुभवी सल्लागारांकडून मार्गदर्शन केले जाईल.तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज आणि शासकीय प्रकल्पांचा लाभ घेण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
मुलाखतीची तयारी, प्रभावी बायोडेटा कसा तयार करायचा, रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयांवर प्रशिक्षण दिले जाईल. "करिअर दिशा" च्या प्रत्येक कार्यक्रमादरम्यान अटल युवा रोजगार बूथ स्थापन केला जाईल, जिथे नोकरीसाठी इच्छुक तरुण आपला बायोडेटा सबमिट करू शकतील. आमच्याकडे येणारा सर्व बायोडेटा या कार्यक्रमात आमच्याशी संबंधित मुंबईतील विविध कंपन्यांना वितरित केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईतील प्रत्येक तरुणापर्यंत पोहचून आणि त्यांचे सोनेरी भविष्य घडवण्यासाठी शक्य तेवढे सहकार्य करणे हे भारतीय जनता युवा मोर्चाचे ध्येय असल्याचे तेजिंदर सिंग तिवाना यांनी सांगितले.